जागा १८०, उमेदवार २१ हजार
By admin | Published: November 19, 2015 11:06 PM2015-11-19T23:06:51+5:302015-11-20T00:09:00+5:30
जिल्हा परिषद कर्मचारी भरती : २५ नोव्हेंबरपासून लेखी परीक्षा
रत्नागिरी : जिल्हा परिषदेत कर्मचारी भरती प्रक्रिया सुरूअसून, १८० जागांसाठी राज्यभरातून २१ हजार १७८ सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. या रिक्त जागांसाठी २५ नोव्हेंबरपासून लेखी परीक्षा होणार आहेत.
राज्यभरातील जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांसाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. मध्यंतरी नगर परिषदा, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या आचारसंहितमुळे या भरतीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आचारसंहिता संपताच पुन्हा ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी १८० जागा भरावयाच्या आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष)- ७ जागा, आरोग्य सेवक (महिला)- ५४ जागा, औषध निर्माण अधिकारी- ३, कंत्राटी ग्रामसेवक- ६२, कनिष्ठ सहायक (लिपिक)- ९, परिचर- २१, वरिष्ठ सहायक (लेखा)- १, विस्तार अधिकारी (कृषी)- १, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)- १, स्त्री परिचर- ३, पशुधन पर्यवेक्षक- १४, पर्यवेक्षिका (अंगणवाडी सेविकेतून)- २, पर्यवेक्षिका (एकात्मिक बाल विकास योजना)- २ ही पदे भरावयाची आहेत. या रिक्त जागांसाठी २१ हजार १७८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. (शहर वार्ताहर)
ुवेळापत्रक जाहीर, विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार
या कर्मचारी भरतीसाठी उमेदवारांसाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेचे वेळापत्रकही जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे. दि. २५ नोव्हेंबरला औषध निर्माण अधिकारी, वरिष्ठ सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), पर्यवेक्षिका, पर्यवेक्षिका (अंगणवाडी सेविकेतून). दि. २८ नोव्हेंबरला पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ सहायक (लिपिक), दि. २९ रोजी विस्तार अधिकारी (सांख्यिकी), परिचर, स्त्री परिचर आणि दि. २ डिसेंबरला कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी परीक्षा होणार आहे. या परीक्षा विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आल्या आहेत.