कचरा प्रक्रियेकरीता जागा , स्वच्छता सर्वेक्षण ब्रँड अँबॅसिडरवरुन कणकवली विशेष सभेत खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 04:47 PM2018-11-29T16:47:58+5:302018-11-29T16:52:35+5:30

स्वच्छता सर्वेक्षण २०१९साठी ब्रँड अँबॅसिडर नियुक्ती करणे,  नगरपंचायत हद्दीतील गारबेज डेपो जवळील 3 एकर जागा कचऱ्यावरील प्रक्रियेकरीता भाड़े तत्वावर देणे, अभिनंदनाचे ठराव घेणे, मागील सभेच्यावेळी

Space for Garbage Process, Cleanliness Survey from Brand Ambassador, Kankavali, Special Meeting | कचरा प्रक्रियेकरीता जागा , स्वच्छता सर्वेक्षण ब्रँड अँबॅसिडरवरुन कणकवली विशेष सभेत खडाजंगी

कचरा प्रक्रियेकरीता जागा , स्वच्छता सर्वेक्षण ब्रँड अँबॅसिडरवरुन कणकवली विशेष सभेत खडाजंगी

Next
ठळक मुद्दे कणकवली नगरपंचायत सभा-माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त समजते. तुम्ही गप्प बसा.असे कन्हैया पारकर त्याना म्हणाले.

 कणकवली : स्वच्छता सर्वेक्षण २०१९साठी ब्रँड अँबॅसिडर नियुक्ती करणे,  नगरपंचायत हद्दीतील गारबेज डेपो जवळील 3 एकर जागा कचऱ्यावरील प्रक्रियेकरीता भाड़े तत्वावर देणे, अभिनंदनाचे ठराव घेणे, मागील सभेच्यावेळी विरोधकांनी केलेला 'वॉक आऊट ' अशा विविध  मुद्यांवरुन नेहमीप्रमाणेच  सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये कणकवली नगरपंचायतच्या विशेष सभेत खडाजंगी उडाली. आक्रमक झालेल्या दोन्ही बाजूच्या नगरसेवकांमुळे काही काळ सभेतील वातावरण तंग झाले होते.

        कणकवली नगरपंचायतीची  विशेष सभा गुरुवारी परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष रविंद्र गायकवाड़ , मुख्याधिकारी मनोज उकिर्डे नगरसेविका मेघा गांगण , सुप्रिया नलावडे अनुपस्थित होते.

        या सभेमध्ये प्रामुख्याने कणकवली नगरपंचायत हद्दीतील गारबेज डेपो जवळील 3 एकर जागा कचऱ्यावरील प्रक्रियेकरीता भाड़े तत्वावर देण्याबाबत आलेल्या निविदाना मंजूरी देण्याचा मुद्दा चर्चेत आला. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी या मुद्याला आक्षेप घेतला. ए.जी.डॉटर्स कंपनी बरोबर कचरा निर्मुलन प्रकल्पासाठी जमिन हस्तांतर प्रक्रीयेचा करार नगरपंचायतीने केला असल्याची वृत्ते प्रसिध्दि माध्यमातून यापूर्वी आली आहेत. कचरा निर्मूलन प्रकल्पासाठी  एजन्सी अगोदरच ठरली असेल आणि तीच्या बरोबर करार झाला असेल तर आता  निविदा मागविण्याचे नाटक कशासाठी करीत आहात ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

       यावर  संबधित एजन्सिचा नगरपंचायतकडे प्रस्ताव आलेला आहे. कोणताही करार झालेला नाही , असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले. मात्र, वर्तमानपत्रे तसेच इतर प्रसिध्दि माध्यमातून करार झाल्याचे प्रसिध्द झाले आहे . त्यामुळे ती माहिती जर खोटी असेल तर संबधितांवर नगरपंचायतीची बदनामी केल्याचे गुन्हे दाखल करा.असा उपरोधिक टोला कन्हैया पारकर यांनी यावेळी सत्ताधाऱ्याना  लगावला . या मुद्यावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकात खडाजंगी उडाली.

     कन्हैया पारकर तुम्ही त्यावेळी भूमिगत होता. त्यामुळे तुम्हाला नेमके काय झाले ते माहिती नाही. असे बंडू हर्णे यानी पारकर यांना  सुनावले. तर माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त समजते. तुम्ही गप्प बसा.असे कन्हैया पारकर त्याना म्हणाले.

याचवेळी कन्हैया पारकर यांचा मुद्दा रूपेश नार्वेकर यानी उचलून धरला . त्यावेळी तुम्ही सर्व माहिती मुख्याधिकाऱ्यांकडून विचारुन घेता. मग हे तुम्हाला कसे माहिती नाही.असे अभिजीत मूसळे यांनी नार्वेकर यांना विचारले.  यावरून जोरदार वादंग झाला.

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कन्हैया पारकर यांना तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का? असे यावेळी विचारले. त्यावर उत्तर मिळाले. पण ते आवडले नाही. असे पारकर यांनी सांगितले. यावरूनहि सभेत गदारोळ झाला. 12 एप्रिलला  तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे. असे मूसळे यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पारकर व नार्वेकर संतप्त झाले. तुमचीही जागा तुम्हाला लवकरच समजेल असे ते म्हणाले.

     यावेळी सुशांत नाईक यांनी संबधित कंपनीची माहिती द्या असे सांगितले. त्यामुळे नगराध्यक्ष त्याबाबत बोलत असताना आम्ही माहिती अधिकारात माहिती घेऊ असे रूपेश नार्वेकर म्हणाले. त्यामुळे तुम्ही तशीच माहिती घ्या असे सांगत नगराध्यक्षानी सभेतील पुढील मुद्दा घेण्यास वरिष्ठ लिपिक किशोर धुमाळे यांना सांगितले.

       त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी ब्रँड अँबॅसिडर नियुक्ती करण्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यावरुनही खडाजंगी झाली. यावेळी प्रसाद राणे यांनी ब्रँड अँबॅसिडर पदाचा राजीनामा का दिला? असा प्रश्न कन्हैया पारकर यांनी विचारला.तसेच राणे यांच्या राजीनाम्यामागे राजकीय षडयंत्र आहे . असा आरोप त्यांनी यावेळी केला.  रुपेश नार्वेकर यांनी पारकर यांना यावेळी समर्थन दिले. तर बंडू हर्णे यांनी त्यांना  पाठिंबा देऊ नको असे नार्वेकर याना उद्देशून वक्तव्य केले. हर्णे यांच्या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत पुन्हा वाद झाला. नगराध्यक्ष नलावडे यांनी यात हस्तक्षेप केला.

        पर्यावरणप्रेमी प्रसाद राणे यांना पुन्हा ब्रँड अँबॅसिडरपदी कायम राहावे यासाठी सर्वांनी विनंती  करुया.असे पारकर व नार्वेकर यांनी सांगितले. त्यावेळी  मी स्वतः आणि मुख्याधिकाऱ्यांनी प्रसाद राणे यांना राजीनामा मागे घेण्याची  दोन वेळा विनंती केल्याचे  नगराध्यक्ष नलावडे यांनी स्पष्ट केले.

        प्रसाद राणे यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा ठराव घेण्याची रुपेश नार्वेकर यांनी यावेळी  मागणी केली. मात्र , दोन वेळा विनंती करून त्यानी राजीनामा मागे न घेतल्याने आपण  ठराव घेणार नाही.असे समीर नलावडे यांनी सांगितले. पारकर व नार्वेकर जर प्रसाद राणे यांच्याकडे पुन्हा विनंती करण्यासाठी जात असतील तर त्यांच्या सोबत मीही येईन.असे नलावडे यांनी यावेळी सांगितले.
   

  यावेळी प्रसाद राणे यांनी स्वच्छता अभियानात चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार करा असे सुशांत नाईक व रूपेश नार्वेकर यांनी सुचविले. मात्र, त्यांचा यापूर्वी सत्कार केला असून परत करण्यापेक्षा निरोप समारंभ करुया .असे बंडू हर्णे यांनी सुचविले. या मुद्यावरुनही खडाजंगी झाली.

         या सभेच्या सुरुवातीला सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात यावा असे सुचवीले. बांधकरवाडी येथे रेल्वे भुयारी मार्ग होण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला असल्याचे ते म्हणाले. यावेळी बंडू हर्णे यांनी खासदारानी  रेल्वे स्थानका शेजारी उद्यान उभारण्याचे आश्वासन दिले होते. तसेच खासदार निधी देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे . तसे त्यांनी  केल्यावर अभिनंदनाचा ठराव निश्चितच घेऊ असे सांगितले. त्यामुळे काही काळ या मुद्यावरुनही जोरदार चर्चा झाली. अशा अनेक मुद्यावरून ही सभा गाजली.

          शहरात विविध प्रभागात नगरपंचायतीच्यावतीने स्वच्छता अभियान राबवायचे असल्यास नगरसेवकांनी तसे पत्र नगराध्यक्षाना द्यावे. त्यामुळे नगरपंचायतीला आवश्यक साहित्य संबधित प्रभागात पुरवता येईल .असे आरोग्य सभापती विराज भोसले यांनी यावेळी सांगितले. नगरपंचायत निधीतून करायची कामे, स्थायी समितीत सुचविलेली कामे अशा विविध मुद्यांवरही यावेळी चर्चा झाली. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांमुळे ही सभा नेहमी सारखीच गाजली.

अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावी !

राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी नगरपंचायतमध्ये झालेल्या बैठकीत विविध सुविधाबाबत दिलेली आश्वासने पूर्ण करावित. महामार्गाच्या कामामुळे पथदीप, नळ पाणी व्यवस्था , विज प्रवाह या सेवा खंडित होत आहेत. त्या पूर्ववत कराव्यात. धुळीचे साम्राज्य पसरले असून त्याचा बंदोबस्त करावा. यासाठी नगराध्यक्षानी आपल्या स्तरावरून प्रयत्न करावेत.अशी मागणी नगरसेवक अबिद नाईक यांनी केली. शुक्रवारी संबधित अधिकाऱ्यां बरोबर बैठक घेऊन या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन समीर नलावडे यांनी यावेळी  दिले.

 कणकवली नगरपंचायत विशेष  सभेत बुधवारी सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नगरसेवकात खडाजंगी  उडाली.

Web Title: Space for Garbage Process, Cleanliness Survey from Brand Ambassador, Kankavali, Special Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.