चौपदरीकरणातील कुडाळ प्रांताधिकार्यांचे अधिकार काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:25 PM2020-11-14T17:25:11+5:302020-11-14T17:26:51+5:30
highway, kudal, sindhudurgnews महामार्ग क्र. ६६ चे कुडाळ हद्दीतील कुडाळ उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडील सर्व कामकाज काढून घेऊन ते कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे देण्यात आले आहे. तसे आदेश कोकण विभागाचे उपायुक्त (महसूल) मनोज रानडे यांनी दिले आहेत. या आदेशामुळे कुडाळ हद्दीतील प्रकल्पग्रस्तांची मोठी गैरसोय होणार आहे.
कुडाळ : महामार्ग क्र. ६६ चे कुडाळ हद्दीतील कुडाळ उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडील सर्व कामकाज काढून घेऊन ते कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे देण्यात आले आहे. तसे आदेश कोकण विभागाचे उपायुक्त (महसूल) मनोज रानडे यांनी दिले आहेत. या आदेशामुळे कुडाळ हद्दीतील प्रकल्पग्रस्तांची मोठी गैरसोय होणार आहे.
कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांच्या अखत्यारीत कसाल ते झाराप झीरो पॉईंटपर्यंत महामार्गाचा भाग येतो. या भागातील मूळ व पुरवणी निवाड्यातील प्रकल्पग्रस्तांचा शासनाकडून आलेला नुकसानीचा निधी मोठ्या प्रमाणात वाटप केला गेला. तरीदेखील अजूनही मूळ व पुरवणी निवाड्यातील जवळपास ८० कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे. या वाटपात अनेक वादादित विषय आहेत. परिणामी, प्रत्येक प्रस्ताव डोळसपणे तपासून ती प्रकरणे निकाली काढावी लागत आहेत.
सद्यस्थितीत गेल्या सहा महिन्यांत पुरवणी यादीतील ८४ कोटी रुपयांच्या निधीपैकी ४० कोटी रुपयांचे कुडाळ उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडून वाटप करण्यात आले आहे. उर्वरित ४० कोटी रुपयांचे वाटप होणे बाकी आहे. हे वाटप मृत खातेदार आणि बाहेरगावी असलेल्या व्यक्तींनी नोटिसा न स्वीकारल्यामुळे राहिले असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगितले जात आहे.
कुडाळ हद्दीतील प्रकल्पग्रस्तांना आपल्या नुकसानीच्या निधीसाठी कणकवलीला ये-जा करावी लागणार आहे. हरकत घेणे, हरकतीच्या केसेसना उपस्थित राहणे,
नोटीस स्वीकारायला जाणे आदी विविध कारणांसाठी प्रकल्पग्रस्त खातेदारांना कणकवलीला ये- जा करावी लागणार आहे. यात वेळ आणि पैशाचा मोठा अपव्यय होणार आहे.
१५ दिवस काम राहणार ठप्प : प्रकल्पग्रस्तांची परवड
मुंबई- गोवा महामार्ग क्र. ६६ मधील प्रकल्पग्रस्तांच्या नुकसानीचा निधी प्रकल्प सुरू झाल्यापासून कुडाळ उपविभागीय कार्यालयाकडून वाटप केला जात होता.
मात्र, आता शेवटच्या टप्प्यात अधिकारी वर्गात तू -तू.. मैं-मैं च्या कारणामुळे कुडाळ उपविभागीय अधिकारी यांच्याकडून ते अधिकार काढून कणकवली उपविभागीय अधिकार्यांकडे देण्यात आले आहेत; पण हा पदभार द्यायलाच १५ दिवसांचा अवधी जाणार आहे. म्हणजेच हे १५ दिवस याबाबतचे काम पूर्णतः ठप्प राहणार आहे. दुसरीकडे या निर्णयामुळे कुडाळ हद्दीतील प्रकल्पग्रस्तांचीही मोठी परवड होणार आहे.