विधानसभेच्या तयारीला लागा, नारायण राणेंचे सिंधुदुर्गात वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 10:19 PM2017-10-24T22:19:54+5:302017-10-24T22:20:19+5:30
सावंतवाडी तालुक्यात समर्थ विकास पॅनेलमधून ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केलेल्या सरपंच व सदस्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला.
सावंतवाडी - तालुक्यात समर्थ विकास पॅनेलमधून ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केलेल्या सरपंच व सदस्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचनाही राणे यांनी उपस्थितांना केल्या. निगुडे येथील शिवसेना उपविभागप्रमुख बंटी उर्फ बाबाजी गावडे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.
स्वाभिमान पक्षात तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत प्रवेश करणार असल्याचे संजू परब यांनी नारायण राणे यांना सांगितले. यावेळी त्या गावातील कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच गावपॅनेलच्या ग्रामपंचायतीही आपल्या पक्षात येणार असल्याचे संजू यांनी सांगितले.यावेळी तालुकाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे यांच्यासह कवठणी सरपंच सुमन कवठणकर, वाफोली सरपंच अर्चना आरोंदेकर, कलंबिस्त सरपंच शरद नाईक, निरवडे सरंपच प्रमोद गावडे, चराठा सरपंच बाळू वाळके, मडुरा सरपंच वेदिका मडुरकर, कुणकेरी सरपंच विश्राम सावंत आदी स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना सूचना
नारायण राणे जिल्हा दौ-यावर आले असता त्यांनी सावंतवाडीत तालुक्यातील कार्यकर्त्यांची येथील माजी खासदार कार्यालयात भेट घेतली. यावेळी आमदार नीतेश राणे व नीलम राणे उपस्थित होत्या. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतानाच त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असेही, कार्यकर्त्यांना सांगितले.