मतदार नोंदणीसाठी २३ व २४ रोजी विशेष मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 02:58 PM2019-02-21T14:58:36+5:302019-02-21T15:00:48+5:30
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ लक्षात घेता नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नाव नोदणी न झालेल्या नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी म्हणून पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी २३ व २४ फेब्रुवारी २०१९ या दोन दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.
सिंधुदुर्गनगरी : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ लक्षात घेता नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नाव नोदणी न झालेल्या नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी म्हणून पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसाठी २३ व २४ फेब्रुवारी २०१९ या दोन दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.
सदर नोंदणी ही १ जानेवारी २०१९ रोजीच्या अर्हता दिनांकावर अधारित असणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नागरिकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत.
तसेच नागरिकांना मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी १ जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अधारित मतदार यादी उपलब्ध असणार आहे. तसेच निरक्षर मतदारांसाठी सदर मतदार यादीचे वाचन मतदान केंद्रावर व गावात चावडी वाचन करण्यात येणार आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे मतदार नाव नोंदणीसाठीचे विहित नमुने उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मतदारांनी मतदार यादीतत्यांचे नाव आहे किंवा कसे याची खातरजमा करावी, तसेच ज्यांचे नाव मतदार यांदीत नाही अशा मतदारांनी आपले नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, यांनी केले आहे.