नगराध्यक्षांनी वापरला विशेष मताधिकार

By admin | Published: June 21, 2016 09:44 PM2016-06-21T21:44:40+5:302016-06-22T00:13:47+5:30

कणकवली नगरपंचायत सभा : पर्यटन महोत्सवाचा खर्च, नगरपंचायत फंडातील निधी वापरण्यास अखेर मंजुरी

Special franchise used by the city chief | नगराध्यक्षांनी वापरला विशेष मताधिकार

नगराध्यक्षांनी वापरला विशेष मताधिकार

Next

कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सवासाठी नगरपंचायत फंडातून दहा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजुरी देण्याच्या मुद्याला काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी पूर्वीपासून असलेला आपला विरोध कायम ठेवला. तर या ठरावाच्या बाजूने आठ सत्ताधारी नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांची मते समसमान झाली. त्यावेळी नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांनी आपला विशेष मताधिकार वापरत निधी खर्च करण्याच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने हा ठराव नऊ मतांनी अखेर मंजूर झाला आहे.
दरम्यान, सुरुवातीपासूनच एकमेकाला चिमटे काढत खेळीमेळीच्या वातावरणात सुरु असलेली सभा आयत्या वेळच्या मुद्यांमध्ये पर्यटन महोत्सवासाठी नगरपंचायत फंडातून निधी खर्च करण्याच्या मुद्यावरून गाजली. सत्ताधारी तसेच विरोधकांनी एकमेकांवर या विषयावरुन आरोप केले. त्यामुळे काही वेळ सभागृहातील वातावरण तंग बनले होते.
कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी नगरपंचायतीच्या प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात झाली. यावेळी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे उपस्थित होते. यापूर्वीच्या दोन विशेष सभांना माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे या सर्वसाधारण सभेत नेमके काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच होती.
सभा सुरु झाल्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त सभेच्या अगोदर किमान दोन दिवस तरी आम्हाला द्या, अशी मागणी समीर नलावडे यांनी केली. त्याला सहमती दर्शविण्यात आली. त्यानंतर एकमेकांवर टीकाटिप्पणी करीत सभा सुरु होती. मात्र, अजेंड्यावरील विषय संपल्यावर आयत्या वेळचे विषय घेण्यात आले. यामध्ये पर्यटन महोत्सवाला नगरपंचायत फंडातून दहा लाख रुपये खर्ची घालण्याचा मुद्दा चर्चेत आला. समीर नलावडे यांनी काँग्रेसच्या आठ नगरसेवकांचा हा निधी खर्च करण्याला पूर्वीप्रमाणेच विरोध असल्याचे स्पष्ट केले. बंडू हर्णे, किशोर राणे, अभिजीत मुसळे यांच्यासह आठ नगरसेवकांनी त्याला अनुमोदन दिले.
गोपुरी आश्रमातील गुरांच्या कोंडवाड्यात सीसीटीव्ही बसविण्याच्या मुद्यावरुनदेखील समीर नलावडे व कन्हैया पारकर यांच्यात वाक्युद्ध रंगले. खरोखरच शहरातील मोकाट गुरे पकडली जात आहेत का? नुसती प्रसिद्धीसाठी छायाचित्रे काढण्यापुरती ही मोहीम मर्यादित ठेऊ नका, असे नलावडे म्हणाले.
तर गुरे पकडल्याची नोंद केलेले रजिस्टर बघा म्हणजे तुमच्या नेमकी स्थिती लक्षात येईल असे पारकरांनी सांगितले.
शहरात भुयारी गटार योजना करतानाचा खर्च पाहता शहराचे चार विभाग करून ती टप्प्याटप्प्याने राबविली तर निधी वेळेत उपलब्ध होऊन काम लवकर पूर्ण करता येईल. असे बंडू हर्णे यांनी सुचविले. त्याला सर्वांनी अनुमती दिली. डास प्रतिबंधक औषध फवारणी अजूनही शहरात झाली नसल्याची बाब अभिजीत मुसळे यांनी निदर्शनास आणून दिली. तर येत्या दोन दिवसात ही फवारणी सुरु होईल असे रूपेश नार्वेकर यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबतही चर्चा झाली. वेंगुर्ले पॅटर्नप्रमाणे हा प्रकल्प बनविण्याचे ठरविण्यात आले. तसेच त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचे मान्य करण्यात आले.
प.पू.भालचंद्र महाराज आश्रमाजवळील आरक्षण विकसित करताना परिपूर्ण आराखडा तयार करा अशी मागणी बंडू हर्णे यांनी केली. तर या आरक्षणाच्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक, वाचनालय, चेंजिंग रूम, टॉयलेट, कंपाऊंड वॉल, गेट, उद्यान, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल अशा खेळांसाठी मैदान बनविण्याचे नियोजन असल्याचे कन्हैया पारकर यांनी सांगितले. सुशांत नाईक यांनी स्विमींग टँक उभारण्यात यावा असे सुचविले. त्याबाबत इतर नगरपालिकांकडून त्यांचे अनुभव जाणून घ्या असे समीर नलावडे म्हणाले. गुरखा मानधन, बहुउद्देशीय सभागृह, व्यायामशाळा, ढालकाठी ते मुख्य चौक रस्त्याच्या दुतर्फा गटार बांधणी, शिवाजीनगर उद्यान, वन महोत्सवांतर्गत वृक्ष लागवड आदी मुद्यांवरही चर्चा झाली. (प्रतिनिधी)


तंग झालेले वातावरण निवळले
पर्यटन महोत्सवासाठी ३0 ते ४0 लाख रूपये जमा करण्यात आल्याचा आरोप अभिजीत मुसळे यांनी केला. तसेच या महोत्सवासाठीच्या निधीचा जमा खर्च जनतेसमोर सादर करा अशी मागणी केली. पर्यटन महोत्सवाचा कारभार पारदर्शक असल्याचे बांधकाम सभापती रुपेश नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. तर पुढच्या सभेत सर्व जमाखर्च सभागृहापुढे ठेवण्यात येईल, असे नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे काहीसे तंग झालेले वातावरण निवळले.

कणकवली नगरपंचायत फंडात फक्त दीड लाख रुपयेच जमा आहेत. तर विविध नागरी सुविधा पुरविणाऱ्यांना नगरपंचायत या फंडातून १२ ते १३ लाख रुपये देणे लागते. पर्यटन महोत्सवासाठी या फंडातील निधी देण्याअगोदर ते पैसे देण्यात यावेत. अशी मागणी समीर नलावडे यांनी यावेळी केली. पर्यटन महोत्सवाचा जमा झालेला निधी जमा करण्यासाठी बँकेत खाते खोलले आहे का? असा प्रश्न अभिजीत मुसळे यांनी नगराध्यक्षांना केला. तर खाते खोलल्याचे उपनगराध्यक्षांनी यावेळी सांगितले.

Web Title: Special franchise used by the city chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.