विशेष सभा झाली दुसऱ्यांदा रद्द
By admin | Published: May 7, 2016 12:27 AM2016-05-07T00:27:38+5:302016-05-07T00:41:31+5:30
कणकवली नगरपंचायत : रस्त्यांसह विकास कामे रखडणार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
कणकवली : कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा गणपूर्ती अभावी शुक्रवारी पुन्हा एकदा रद्द झाली. त्यामुळे शहरातील रस्त्यांसह विविध विकास कामांच्या निविदांना मंजूरी मिळू शकली नाही. परिणामी आता शहरातील रस्त्यांची कामे रखडणार आहेत.
कणकवली नगरपंचायतीची विशेष सभा यापूर्वी २ मे रोजी होती. मात्र, या विशेष सभेला माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह काँग्रेसचे काही नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे ही विशेष सभा होऊ शकली नव्हती. त्यानंतर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी एकमेकांवर परस्परविरोधी आरोप केले होते. त्यांच्यात हा कलगीतुरा रंगला असतानाच शुक्रवारी दुपारी ३ वाजता पुन्हा नगरपंचायतीची विशेष सभा होणार होती. यावेळी नगरपंचायत कार्यालयातील प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे, बांधकाम सभापती रूपेश नार्वेकर, नगरसेवक सुशांत नाईक, राजश्री धुमाळे, नंदिनी धुमाळे, स्नेहा नाईक, सुमेधा अंधारी, प्रा. दिवाकर मुरकर उपस्थित होते. मात्र, सभेच्या नियोजित वेळेनंतर एक तास उलटून गेल्यानंतरही इतर नगरसेवक सभागृहात फिरकलेच नाहीत. (वार्ताहर)