सैन्यभरतीसाठी विशेष क्रीडांगणे आवश्यक : खजुरिया
By admin | Published: February 11, 2015 10:17 PM2015-02-11T22:17:16+5:302015-02-12T00:40:08+5:30
प्रस्ताव देणार : निकष, गुणवत्तेच्या आधारावरच भरती
रत्नागिरी : सैन्यदलात भरतीसाठी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या तरुणांची निवास व प्रसाधनगृहांची योग्य व्यवस्था होण्यासाठी राज्यात चार ठिकाणी खास क्रीडांगणे उभारावीत, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार लवकरच तसा प्रस्ताव राज्य शासनाला दिला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यांच्या सैन्यभरती विभागाचे उपसंचालक ब्रिगेडिअर एम. एस. खजुरिया यांनी येथे पत्रकारपरिषदेत दिली.
रत्नागिरीसह सिंंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील युवकांसाठी रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सुरू असलेल्या सैन्यभरती प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित आहे. गेल्या तीन दिवसांत येथे भरती प्रक्रियेत दहा हजारांवर युवकांनी सहभाग नोंदविला.
रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने सैन्यभरती आयोजनासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून ब्रिगेडियर खजुरिया म्हणाले, रत्नागिरीत दहा वर्षांनंतर ही भरती प्रक्रिया होत असून, ही प्रक्रिया १८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. २४० पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. या भरतीत जे तरुण सहभागी होतात, त्यातील ७० टक्के अपात्र ठरतात. २५ ते ३० टक्केच तरुण सैन्यभरतीत पात्र ठरतात.
सैन्यात भरतीला पात्र ठरण्यासाठी अनेक अटी आहेत. त्याबाबत तीन महिने आधी माहिती दिली जाते. तसेच वेबसाईटवरही याची माहिती दिली जाते. मात्र, काही नोंदणीकृत व नोंदणी नसलेल्या अकादमी या पात्रतेबाबतच्या अटी माहिती असतानाही पात्रता अटीत न बसणाऱ्या तरुणांना सरावासाठी प्रवेश देतात, त्यांच्याकडून शुल्क घेतात. अशा अटी पूर्ण न करणाऱ्या तरुणांची निवड होत नाही. त्यामुळे अशी फसवणूक होऊ नये, असे खजुरिया म्हणाले.
ही सैन्यभरती सैनिक जनरल ड्युटी, सैनिक टेक्निकल, सैनिक क्लर्क, स्टोअर किपर, सैनिक नर्सिंग असिस्टंट व सैनिक ट्रेड्समन या ट्रेडकरिता होत आहे. सैन्यभरतीमध्ये जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही ब्रिगेडिअर एम. एस. खजुरिया यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
‘मिडलमॅन’ला थारा नाही : खजुरिया
सैन्यात निवड होण्यासाठी गुणवत्ता हा एकमेव निकष असल्याने या प्रक्रियेत मिडलमॅनला अजिबात थारा नाही. पारदर्शकरित्या ही निवड प्रक्रिया होत असून, पाच टप्प्यांमध्ये बायोमेट्रिक चाचण्या होतात. मेरीटवरच ही निवड होत असल्याने कोणाच्याही भूलथापांना बळी पडून आपल्या पालकांच्या श्रमाची कमाई फसवणूक करणाऱ्यांच्या तोंडात घालू नये. सैन्यभरतीत अशा कोणत्याही प्रकाराला थारा दिला जात नाही. कुणी व्यक्ती आमिष दाखवत असेल तर थेट पोलिसात तक्रार करावी, असे आवाहनही ब्रिगेडियर खजुरिया यांना केले आहे.