नाताळ, नववर्षानिमित्त धावणार विशेष रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:39 AM2019-12-17T11:39:52+5:302019-12-17T11:49:10+5:30
नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोकण व गोव्यात जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी आणि एर्नाकुलम मार्गावर धावणार आहेत.
रत्नागिरी : नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोकण व गोव्यात जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी आणि एर्नाकुलम मार्गावर धावणार आहेत.
कोकण रेल्वे प्रशासनाने या गाड्यांचे नियोजन केले असून, त्यानुसार ०१०३७ लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी ही विशेष गाडी २३ डिसेंबर आणि ६ जानेवारी रोजी रात्री १.१० वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी ११.३० वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. तर ०१०३८ गाडी त्याचदिवशी दुपारी २.२० वाजता निघून लोकमान्य टिळक टर्मिनसला रात्री १२.२० वाजता पोहोचणार आहे.
या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकात थांबा दिलेला आहे.
तसेच ०१०७९ क्रमांकाची विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोच्युवेली अशी दिनांक २१, २८ डिसेंबर आणि ४ जानेवारी रोजी रात्री १२.४५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०५ वाजता कोच्युवेलीला पोहोचेल. ०१०८० क्रमांकाची गाडी दिनांक २०, २२ डिसेंबर आणि ५ जानेवारी रोजी दुपारी २.१५ वाजता सुटणार असून, लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पोहोचणार आहे.
या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, मडगाव, कारवार, कुमठा, मुरूडेश्वर, उडुपी आणि कोलाम हे थांबे देण्यात आले आहेत.