चौपदरीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग
By admin | Published: August 4, 2015 11:46 PM2015-08-04T23:46:00+5:302015-08-04T23:46:00+5:30
मोजणी पूर्णत्त्वाकडे : अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीचे आदेश
रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला असून, त्याअनुषंगाने मोजणीचे काम पूर्णत्त्वाकडे गेले आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या ३ अ अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आजच्या बैठकीत उपविभागीय कार्यालयांना दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या मोजणीची प्रक्रिया पूर्णत्त्वाकडे गेली आहे. याचे सर्व नकाशे महसूल विभागाकडून तयार करण्यात आले आहेत. या नकाशांच्या प्रती काढून देण्याचे काम मोनार्च या खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. आता त्यापुढील कार्यवाही म्हणजे ३ अ अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही महत्त्वाची आहे. याची अंमलबजावणी त्वरित होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज सकाळी आयोजित केली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी विविध उपस्थित होते. यावेळी मोजणी प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला.
भूसंपादन प्रक्रियेसाठी हिस्सा क्रमांक, सर्व्हे नंबर, क्षेत्र, मोजणी पत्रक या गोष्टी सातबाराशी जुळतात की नाहीत, याची तपासणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून करावी लागणार आहे.
या प्रक्रियेला विलंब न करता येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण करून ३ अ अधिसूचना प्रसिद्धीप्रक्रिया सुरू करावी, असे आदेश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि चिपळूण या चार तालुक्यांमध्ये ३ अ प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात या चार तालुक्यांमधील ३ अ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हरकती मागविण्यात येणार असून, त्यावर सुनावणी झाल्यानंतर भूसंपादनाची अंतिम प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याकरिता ३ ड अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे मोजणीनंतर आता ३ अ अधिसूचना प्रसिद्धीच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या उपविभागीय कार्यालयांना सूचना.
मोजणीची प्रक्रिया पूर्णत्त्वाकडे.
सर्व नकाशे महसूल विभागाकडून तयार.
नकाशाच्या प्रती काढण्याचे काम मोनार्च कंपनीकडे.