चिपी विमानतळाला गती द्या, राजन तेलींची केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे मागणी
By अनंत खं.जाधव | Published: July 1, 2024 04:05 PM2024-07-01T16:05:43+5:302024-07-01T16:06:32+5:30
सावंतवाडी : चिपी विमानतळ प्रकल्प हा पर्यटन सिंधुदुर्गच्या विकासाचा मानबिंदू आहे. त्यामुळे विमानतळ सुव्यवस्थितरित्या सुरू राहणे हे जिल्हयाच्या विकासाला ...
सावंतवाडी : चिपी विमानतळ प्रकल्प हा पर्यटन सिंधुदुर्गच्या विकासाचा मानबिंदू आहे. त्यामुळे विमानतळ सुव्यवस्थितरित्या सुरू राहणे हे जिल्हयाच्या विकासाला अधिक गती देणारे ठरणार आहे. सद्यस्थितीत हा प्रकल्प गतीमान करण्याची मागणी भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, चिपी विमानतळाला योग्य प्रतिसाद मिळवायचा असल्यास या दरम्यानच्या परिसरात राज्य शासनाच्या माध्यमातून उद्योग खात्यातर्फे एमआयडीसी निर्मितीला चालना मिळावी. परिसरातील शेतकऱ्यांच्या संमतीने एमआयडीसी सुरू करता येईल का, याची पाहणी करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत आपल्याकडे ही विमानसेवा सुरू आहे. मुंबई ते चिपी तिकीट ४० टक्के कमी दरात उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारकडे पुढील काही वर्ष ही विशेष सेवा सुरू राहण्यासाठी प्रस्ताव मांडावा.
सिंधुदुर्ग जिल्हयाच्या सीमेवर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू झाला आहे. तिथे प्रतिदिन विमान उड्डाणसेवा जास्त व दर माफक असल्याने तेथे प्रवासी संख्या जास्त आहे. चिपी एअरपोर्टवरील तिकीट दर कमी ठेवला आणि उड्डाण संख्या वाढली तर प्रवासी संख्या नक्की वाढेल, यादृष्टीने विचार व्हावा. एअरपोर्ट अॅथॉरिटीमार्फत उत्तर गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हवाई कॉम्बो प्लॅनचा पर्याय द्यावा. त्यासाठी समोरील खाडीत जेटी उभारून जलप्रवास सोय/परवानगी उपलब्ध करून द्यावी. बॅ. नाथ पै विमानतळाला नाईट लैंडिंगची परवानगी असूनही कंपनीला परवडत नसल्यामुळे ती सुरू करत नाहीत. यात लक्ष घालून मार्ग काढावा, असे त्यांनी सूचित केलेय. यावर मंत्री मोहोळ यांनी यात लक्ष घालू असे आश्वासन दिले.