निधी मार्च अखेर खर्च करा
By admin | Published: February 2, 2015 11:00 PM2015-02-02T23:00:44+5:302015-02-02T23:47:50+5:30
दीपक केसरकरांचे आदेश : जिल्हा नियोजन समिती सभा
सिंधुदुर्गनगरी : यावर्षीच्या नियोजन आराखड्यातील ११ कोटी १७ लाख रुपये अखर्चित राहणार होते. हा निधी खर्च करणाऱ्या खात्यांकडे वळविण्यात आला. अद्यापपर्यंत १४ विभागांनी निधी खर्चाचे खाते उघडलेले नसल्याने हा निधी मार्चअखेर तत्काळ खर्च करा, असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिले.
भाजप-सेना युतीच्या सरकारमधील जिल्हा नियोजनची प्रथमच सभा सोमवारी नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेताना ते बोलत होते.
यावेळी वेंगुर्ला येथील १०० मुलींचे वसतिगृहाचे उद्घाटन सहा महिन्यांपूर्वी पार पडले तरी त्याठिकाणी मुलींची गैरसोय निर्माण होत आहे. प्रत्यक्षात मात्र २५ मुली या वसतिगृहात आहेत. याबाबत सभागृहात नाराजी व्यक्त करण्यात आली.
गुन्हे मागे घ्या : किनळेकरआरोंदा जेटीची पाहणी करण्याचा स्थायी समितीला अधिकार आहे किंवा नाही? चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, अशी मागणी केली. सदस्य वंदना किनळेकर यांनी मुद्दा उपस्थित केला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देताना स्थायी समितीला जेटीची पाहणी करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. तर तेथील रस्ता बंदर विभागाचा आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीचा नाही. तत्कालिन पालकमंत्री नारायण राणे असताना सन २०११ मध्ये ही जागा मेरिटाईम बोर्डाकडे हस्तांतरीत झालेली आहे, अशी माहिती दिली. तर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आरोंदा जेटीप्रश्नी झालेल्या कारवाईबाबत तसेच इतर बाबींची चौकशी करून सविस्तर अहवाल गृह विभागाकडे पाठवा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तर याप्रश्न गृहमंत्रालय योग्य तो निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.यानंतर आपण प्रस्तावित केलेली कामे यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप करीत सर्व मंजूर कामांच्या यादीचे वाचन करण्याची मागणी काँग्रेस सदस्यांनी केली. त्यालाही पालकमंत्र्यांनी सहमती दर्शवली. यादीचे वाचन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तब्बल दीड तास मंजूर कामाच्या यादीचे वाचन सभागृहात करण्यात आले. यावेळी साकवाच्या ठिकाणी ब्रीज कम बंधारे व्हावेत, आंबा नुकसानीचे पंचनामे व्हावेत, नेमळे- ओटवणे भागातील सौरकुंपणाचे काम नियमानुसार व्हावे, मच्छिमारांना अद्ययावत सुविधा द्याव्यात, अशा विविध सूचना सदस्यांनी केल्या. तर सिंधुदुर्ग जिल्हा खड्डेमुक्त व्हावा, याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे. शाळा दुरूस्तीसह विविध महत्त्वाची कामे हाती घेण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली. मागासवर्गीयांच्या योजना, वसतीगृहातील गैरसोयी, अनुसूचित जाती- जमातीसाठीचा अखर्चित निधी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी चांगलेच खडसावले. तर निधी वेळेत खर्च करा, आवश्यक सुविधा तत्काळ द्या, निधी अखर्चित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विरोधी सदस्यांचा गदारोळ
सभेच्या सुरूवातीलाच केसरकर यांनी नवनिर्वाचित आमदारांचे अभिनंदन केले. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार बाळा सावंत व व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला. पुढील विषय घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र याला हरकत घेत काँग्रेसच्या सदस्यांनी आमच्या अधिकारावर तुम्ही गदा आणता, आम्हाला ठराव मांडायचे आहेत, असे सांगितले. मात्र केसरकर यांनी मी अध्यक्षपदावरून ठराव घेतले आहेत. ते सर्वांच्यावतीनेच मांडले आहेत. तेव्हा वेगळे ठराव मांडण्याची गरज नाही, असे सांगताच सर्वच विरोधी सदस्यांनी गदारोळ केला. त्यानंतर विषय पत्रिकेनुसार कामकाज सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. यालाही विरोधी सदस्यांनी हरकत घेतली. आपले हरकतीचे मुद्दे आहेत ते प्रथम घ्या न पेक्षा सभा चालू देणार नाही, असा पवित्रा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, आमदार नीतेश राणे, वंदना किनळेकर, दीपलक्ष्मी पडते, अंकुश जाधव यांनी घेत जोरदार हंगामा केला. यानंतर सर्वांना बोलण्याची संधी मिळेल. एकाएकाने मुद्दे उपस्थित करा. दिवसभर सभा चालवायची माझी तयारी आहे, असे पालकमंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.