सावरकर गौरव यात्रेला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद
By अनंत खं.जाधव | Published: April 4, 2023 04:19 PM2023-04-04T16:19:18+5:302023-04-04T16:19:36+5:30
सावंतवाडी : सावरकर गौरव यात्रेला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप व शिवसेना शिंदे गट यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपने ...
सावंतवाडी : सावरकर गौरव यात्रेला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप व शिवसेना शिंदे गट यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाजपने आपल्या कार्यालयाकडून तर शिवसेना शिंदे गटाने आपली यात्रा केसरकर यांच्या कार्यालयाकडून सुरू केली. त्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते शिवरामराजेच्या पुतळ्याजवळ एकत्र आले आणि शहरातून रॅली काढण्यात आली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजप व शिवसेना शिंदे गट हे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सावरकर गौरव यात्रा काढत आहेत. सावंतवाडीतही गौरव यात्रा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. प्रथम शिवराम राजेच्या पुतळ्यास माजी आमदार राजन तेली यांनी पुष्पहार घातल्यानंतर रॅलीला सुरूवात झाली.
त्यानंतर ही रॅली मोती तलावाकडून मिलाग्रीस हायस्कूल, सालईवाडा मार्गे, मुख्य बाजारपेठ, गांधी चौक, उभाबाजार, चितारअळी त्यानंतर नारायण मंदिर जवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी वीर सावरकरांची हुबेहूब प्रतिमा लक्षवेधी ठरत होती. या रॅलीत ढोल पथक, आम्ही सावरकर असे फलक, मी सावरकर आशयाच्या टोप्या घालून कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीचा समारोप झाल्यानंतर अनेकांनी आपले विचार मांडले.
या रॅलीत माजी आमदार राजन तेली, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख नीता कविटकर, एकनाथ नाडकर्णी, परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवसेना शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन
सावरकर गौरव यात्रेत भाजपच्या तुलनेत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जास्त होते. त्यामुळे या रॅलीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा रंगली.