सिंधुदुर्गमधील जिमखाना मैदान विविध कार्यक्रमांना देण्यावरून क्रीडाप्रेमी आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब
By अनंत खं.जाधव | Published: February 2, 2024 03:47 PM2024-02-02T15:47:34+5:302024-02-02T15:52:54+5:30
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असे जिमखाना मैदान वेळोवेळी विविध सांस्कृतिक तसेच शासकीय कार्यक्रमासाठी देण्यात येत असल्याने सावंतवाडीतील क्रीडाप्रेमी ...
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असे जिमखाना मैदान वेळोवेळी विविध सांस्कृतिक तसेच शासकीय कार्यक्रमासाठी देण्यात येत असल्याने सावंतवाडीतील क्रीडाप्रेमी चांगलेच आक्रमक झाले. या प्रकाराची गंभीर दखल घेत क्रीडाप्रेमींनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना जाब विचारला. मात्र ते ही शासन निर्णयासमोर हतबल असल्याचे दिसून आले.
सावंतवाडीत प्रथमच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होत असून त्यासाठी जिमखाना मैदान वापरण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी क्रीडा रसिकांनी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी माजी नगरसेवक उमाकांत वारंग, विलास जाधव यांच्यासह ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, काशिनाथ दुभाषी, मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गुरुनाथ चोडणकर आदी उपस्थित होते.
यावेळी क्रीडा रसिकांनी आक्रमक होत लाखो रुपये खर्च करून नव्याने खेळपट्टी तयार केलेल्या जिमखाना मैदानावर शासकीय कार्यक्रम कसे काय घेता, मैदानाच्या मुख्य खेळपट्टीची सुरक्षा व हानी टाळण्यासाठी मैदान अशा कार्यक्रमांना देऊ नका अशी एकमुखी मागणी केली होती मग मैदान देताच कसे असा सवाल केला.
अलीकडेच लाखो रुपये खर्च करून नव्याने खेळपट्टी बनवण्यात आली. परंतु क्रिकेट सोडून या ठिकाणी लग्न सोहळा अन्य खासगी कार्यक्रमासाठी मैदान पालिकेकडून उपलब्ध करून दिले जात आहे. याचा परिणाम खेळपट्टीवर होत आहे. या जिमखाना मैदानावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू खेळले आहेत. सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूने या मैदानावर सामने खेळले आहेत. असे असतानाही मैदान खासगी कार्यक्रमाला देणे अयोग्य आहे असे मत माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी मांडले.
हे मैदान कुठल्याच कार्यक्रमाला उपलब्ध करून देऊ नका अशी एकमुखी मागणी क्रिकेट प्रेमींनी केली. दरम्यान हा कार्यक्रम शासकीय असल्याने आपण परवानगी नाकारू शकत नाही. मात्र क्रिकेट प्रेमींची विनंती लक्षात घेता या मैदानाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याची काळजी घेऊ असे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी यावेळी सांगितले.