कातळावर फुलली शेती
By admin | Published: September 6, 2015 10:45 PM2015-09-06T22:45:35+5:302015-09-06T22:45:35+5:30
समीर प्रभूदेसाई : गावठी भात, अन्य पिकांची लागवड
मेहरून नाकाडे- रत्नागिरी वकिलीचे शिक्षण पूर्ण करून वकिली करण्यापेक्षा शेतीमध्ये विविध प्रयोग करण्याचे अॅड. समीर प्रभूदेसाई यांनी ठरवले. त्यासाठी वडील सुहास ऊर्फ नाना वामन प्रभुदेसाई यांची प्रेरणा मिळाली. अॅड. समीर यांचा शेतीकडील ओढा पाहून त्यांचे कनिष्ठ बंधूराज सागर यांनीही पदव्युत्तर शिक्षण घेऊनही शेतीकडे आपला मोर्चा वळवला. १५० एकर शेतात सेंद्रीय शेतीबरोबर सतत नवनवीन प्रयोग करण्यात नाणारचे प्रभूदेसाई कुटुंबीय गुंतले आहे. कातळावर चौकोनी खड्डे काढून त्यामध्ये गावठी (तांबडा) भात फुलवला आहे. त्यांच्याकडील भात पसवला असून, छान लोंब्या टाकल्या आहेत.
प्रभूदेसार्इंचे संपूर्ण कुटुंबीय शेतीमध्ये असले तरी नानांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे काम चालते. भाताबरोबर नागली, तूर, कुळीथ, पावटा, हरभरा, भुईमूग यांसारखी पिके घेतात. याशिवाय कलम बागेतून वेलवर्गीय आंतरपिके घेतात. दोडकी, काकडी, पडवळ, चिबूड घेतातच मात्र चिबूड नाशवंत असल्याने त्यामध्ये पैसे होत नाहीत. त्यामुळे भोपळा व कोहाळ्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. भोपळा ६ ते ७ टन, तर कोहाळ्याचे उत्पन्न ८ ते ९ टन इतके घेत आहेत.
प्रभूदेसाई यांनी सुमारे ४५०० साग, तर ३५०० मान जातीचे बांबू, २५०० आंबा, ३००० काजू, नारळाची ५०० झाडे लावली आहेत. नारळामध्ये त्यांनी केळीदेखील लावली आहेत. हापूसबरोबर दशहरा, नीलम, केशर जातीचेही त्यांनी आंबे लावले आहेत. याशिवाय नारळ झाडात काळीमिरी लावली असून, दरवर्षी ५० ते ६० किलो काळिमिरी उत्पन्न घेतात. याशिवाय दालचिनीची रोपे लावली असून, त्याचे उत्पादन सुरू आहे. पारंपरिक, सेंद्रीय शेतीबरोबर आधुनिकतेकडे त्यांचा कल अधिक आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या बागेत एलए-७ जातीची आवळा कलमे दोन एकर जागेत लावली आहेत. लिंब, जांभूळाबरोबर सर्व प्रकारची झाडे त्यांच्या बागेत आढळतात.
कातळावर भातशेती फुलवताना त्यांनी योग्य व्यवस्थापन व नियोजनावर भर दिला आहे. त्यामुळे एक-एक गुंठ्यांचे प्लॉट तयार केले आहेत. सेंद्रीय पध्दतीने शेती करत असताना रासायनिक खतांचा वापर मर्यादित आहे.
स्वत:ची गोशाळा असल्यामुळे घरच्या घरी दूध, तूप, लोणी मिळत असले तरी मलमुत्राचा वापर ते खतासाठी करीत आहेत. भातशेती, कलम बागायतींमध्ये ठिबकचा वापर करण्यात आला आहे. विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा वापर शेतीसाठी करतात. परंतु, प्रत्येक थेंब वाया जाऊ नये, यासाठी कटाक्षाने लक्ष देतात. चार कलमांमध्ये वेल लावल्यामुळे आंतरपीक सहज होते.
बारमाही पिके घेण्यासाठी सुमारे १०० टन खत त्यांना लागते. खताचा खर्च साधारणत: १२ ते १५ लाखापर्यत असायचा. हा खर्च टाळण्यासाठी त्यांनी कंपोस्ट खत तयार करण्याची चार प्रकल्प बागेतच तयार केले आहेत. बागेतील रान, पालापाचोळा, गुरांचे मलमूत्र तसेच आवश्यक घटकांचा वापर करून ते खत तयार करू लागले आहेत. प्रत्येक पिकाला आवश्यक असणारे घटक खतातून देण्याचा प्रयत्न सुरू असतो.
कल्टारचा वापर न करता, हंगामापूर्वी उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते तांबडा भाताचे उत्पादन घेतात. यावर्षी पावसाअभावी भातशेती धोक्यात आली आहे. उत्पादकता घटण्याची भिती वर्तविली जात असताना प्रभुदेसाई यांच्या शेतातील भातशेती उत्तम आहे. तुषार सिंचनावर भातपिक चांगले झाले आहे. तयार भात ते घरीच घिरट, वायण या पारंपरिक पध्दतीचा वापर करून भरडून तांदूळ स्वत: कुटुंबीय, नातेवाईकांसाठी वापरतात. बागेतून त्यांनी रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी जास्त मनुष्यबळ न वापरता वाहनांचा वापर करणे शक्य होत आहे. कातळावर भातशेती करताना उन्हाळ्यात प्लॉट तयार करून चिखल न करता गादीवाफे तयार केले जाते. एक इंचाच्या खड्ड्यात भाताचे चार - पाच दाणे टाकले जातात. त्यामुळे भात लागवड करण्याऐवजी थेट भात तयार झाल्यावर कापणीच केली जाते. जेणेकरून कमी मनुष्यबळाचा वापर होतो, परिणामी खर्च वाढतो. उत्पादनातही वाढ होते. कलमांच्या अळ्यांबरोबर भातातही ठिबक, तुषार सिंचन पध्दती बसवली आहे.