रस्त्यांच्या डागडुजीसाठी एस. टी. सेवा बंद
By Admin | Published: February 18, 2015 10:23 PM2015-02-18T22:23:13+5:302015-02-18T23:50:02+5:30
विद्यार्थ्यांची गैरसोय : शाळा गाठण्यासाठी पायी प्रवास करण्याची आली वेळ..
रत्नागिरी : पाली पंचक्रोशीतील वळके, कशेळी कोंड, पाथरट, निवसर (ता. लांजा) या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे तसेच पूल, मोऱ्या यांची कामे सुरू असल्याने या गावातील रस्ते बंद असल्याने एस. टी. बस सेवाही बंद आहे. त्याचा मोठा फटका या गावातील शालेय विद्यार्थी, नागरिक यांना बसत आहे.पाली - वळके या रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम गेले काही महिने सुरू असून, त्यात रस्ता खोदाई, तसेच मोऱ्या घालण्याचे काम सुरु असल्याने या मार्गावरील एस. टी. बसच्या नेहमीच्या पाच फेऱ्या बंद आहेत. तसेच पाली - कशेळी कोंड या रस्त्याच्या कामामुळेही गेले काही दिवस एस. टी. बस कशेळी धारेपर्यंत जात आहे. त्यामुळे पुढील कोंड तसेच वाडीतील प्रवाशांना यामुळे पायी प्रवास करावा लागत आहे. तसेच सर्वांत महत्त्वाचा व रेल्वेस्थानकाला जोडणारा पाली निवसर रस्ताही पाथरट - नागझरी येथील मोठ्या नवीन पुलाच्या बांधकाम व भराव घालण्यामुळे हा रस्ता मोठ्या वाहनांना बंद करण्यात आल्याने, त्या कारणास्तव या गावातीलही एस. टी. बसच्या दररोजच्या सहा फेऱ्या बंद असल्याने पाथरट, निवसर या गावातील नागरिक, विद्यार्थी यांना पाली-निवसर हा सहा किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागत आहे.
सध्या शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने व हा रस्ता बंद असल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, ही कामे तातडीने पूर्ण करुन एसटी पूर्ववत करण्याची मागणी वळके, कशेळी, पाथरट, निवसर येथील ग्रामस्थांनी केली आहे. निदान बोर्डाच्या परीक्षा सुरु होण्याअगोदर एसटीची सोय व्हावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली आहे. तसेच शिमगोत्सवापूर्वी रस्ता पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. यामध्ये एस. टी. महामंडळाच्या या महत्त्वाच्या एस. टी. फेऱ्या बंद असल्याने दररोज हजारोंचे नुकसान होत आहे.
तसेच छोट्या वडाप व्यावसायिकांचे मात्र यामध्ये फावत असून ते दुप्पट तिप्पट भाडे आकारुन वाहतूक करीत आहेत. त्यामध्ये प्रवाशांना नाईलाजास्तव हा धोकादायक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यांची कामे तातडीने करुन एस. टी. बससेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी परिसरातील प्रवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)