आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी २०५ एस.टी. सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 04:25 PM2020-02-12T16:25:43+5:302020-02-12T16:26:33+5:30
प्रवाशांकडून मागणी झाल्यास विविध गावांतूनही गाड्या सोडल्या जाणार आहेत. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जादा गाड्या १६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासून सुरू होणार असून १८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंत दिवसरात्र वाहतूक सुरू राहणार आहे.
कणकवली : कोकणातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडीची यात्रा १७ फेब्रुवारी रोजी होत आहे. तर देवगड तालुक्यातील कुणकेश्वर यात्रा २१ फेब्रुवारी रोजी असून त्यासाठी एस.टी.प्रशासन सज्ज झाले आहे. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जादा १२५ गाड्या तर कुणकेश्वर यात्रेसाठी ८० अशा २०५ जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ व विभागीय वाहतुक अधिकारी अभिजीत पाटील यांनी दिली.
आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रेच्या पुर्व नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी एस.टी.विभागीय कार्यालय येथे बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंगणेवाडी यात्रेबाबत माहिती देताना विभागीय वाहतुक अधिकारी अभिजीत पाटील म्हणाले, आंगणेवाडी यात्रेसाठी कणकवली,मालवण, कुडाळ या तालुक्यातील परिसरातून मोठया प्रमाणात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तर सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड, विजयदुर्ग या आगारांच्या कार्यक्षेत्रातील परिसरातूनही प्रवासी उपलब्धतेनुसार जादा गाड्या सोडण्यात येतील. याखेरीज प्रवाशांकडून मागणी झाल्यास विविध गावांतूनही गाड्या सोडल्या जाणार आहेत. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी जादा गाड्या १६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासून सुरू होणार असून १८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेपर्यंत दिवसरात्र वाहतूक सुरू राहणार आहे.
प्रवाशांचा ओघ लक्षात घेऊन १६ फेब्रुवारीला जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. कणकवली, मालवण, कुडाळ येथील यात्रास्थानांवरून पहाटे पाच वाजल्यापासून गाड्या सोडण्यात येतील. आंगणेवाडी येथे भाविक प्रवाशांसाठी प्रवासी शेड उभारण्यात आल्या असून गाडीमध्ये सुलभ प्रवेश मिळविण्याच्यादृष्टीने ' क्यू रेलिंगह्णची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. १७ व १८ फेब्रुवारीला कणकवली, कुडाळ, ओरोस रेल्वेस्थानक येथून मालवण व आंगणेवाडी परिसरात जाणार्या प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच रेल्वेस्थानकांच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रक कार्यरत असतील. ते रेल्वे स्टेशन मास्तर यांच्याशी संपर्क ठेवून गाड्या सोडण्याचे नियोजन करणार आहेत.
आंगणेवाडी येथे तीन वाहतूक नियंत्रण कक्ष असतील. त्यातील मालवण परिसरातील गावांसाठी एक कक्ष असेल. तर कणकवली व मसुरे परिसरातील गावांसाठी वेगळेवेगळे कक्ष
असतील.
याखेरीज वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी ठिकठिकाणी गस्ती पथके, क्रेन , ब्रेक डाऊन व्हॅन व इतर यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
गतवर्षी आंगणेवाडी यात्रेसाठी १०६ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामाध्यमातून ९० हजार प्रवाश्यांची वाहतूक करण्यात आली. त्यातून एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला २४ लाख ८० हजारांचे उत्पन्न मिळाले. यावर्षी १२५ जादा गाड्यांची सोय करण्यात आली असून ३० जादा गाड्या इतर विभागातून मागविण्यात आल्या आहेत.
कुणकेश्वर यात्रेसाठी गतवर्षी ७० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. या गाडयामंधुन ६० हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने एस.टी.महामंडळाला २२ लाखाचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ८० गाड्या सोडण्यात येणार असुन यासाठी कणकवली,देवगड व आचरा असे वाहतूक नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. २० ते २३ फेब्रुवारी या कालावधीत या गाड्या धावणार असुन प्रत्येक वर्षाप्रमाणेच आवश्यक त्या ठिकाणावरुन गाड्या सुटणार आहेत. या बरोबरच आंगणेवाडी व कुणकेश्वर या भागातुन यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी प्रवाशी उपलब्ध केल्यास त्या ठिकाणाहुन थेट गाड्या मुंबई,पुणे, कोल्हापुर अशा भागात परतीच्या प्रवासासाठी सोडण्याचे नियोजन केले आहे. यासाठी भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
एस.टी.च्या सेवेचा लाभ घ्या !
आंगणेवाडी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकावरुनही प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार गाड्या सोडल्या जाणार आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी भाविकानी एस.टी.च्या सेवेचा लाभ घ्यावा.असे आवाहन विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केले आहे.