एसटी-दुचाकीची धडक; दोघे युवक जखमी, खारेपाटणजवळील घटना : दुचाकीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:46 PM2018-07-30T12:46:58+5:302018-07-30T12:50:06+5:30
दुचाकी चालकाला समोरुन येणाऱ्या एसटीचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात खारेपाटण येथील यशवंत सुहास फाटक (२१) व तुषार सुहास फाटक (१९) हे दोन युवक जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी २.४५ वाजता खारेपाटण-मुटाट रस्त्यावर घडला.
खारेपाटण : खारेपाटण एसटी आगारातून दुपारी सुटलेली कणकवली आगाराची खारेपाटण-मणचे गाडी मणचे येथून परत खारेपाटणला येत होती. वायंगणी ताम्हणकरवाडी फाट्याच्या पुढे काही अंतरावर एका वळणावर खारेपाटणहून पोंभुर्लेच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी चालकाला समोरुन येणाऱ्या एसटीचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात खारेपाटण येथील यशवंत सुहास फाटक (२१) व तुषार सुहास फाटक (१९) हे दोन युवक जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी २.४५ वाजता खारेपाटण-मुटाट रस्त्यावर घडला.
अपघाताची माहिती कळताच खारेपाटण वाहतूक नियंत्रक चंद्रकांत कांबळे व खारेपाटण पोलीस स्टेशनचे हवालदार प्रतीक जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिंती घेतली. खारेपाटण-मणचे एसटीचालक एम. व्ही. जाधव व वाहक एस. बी. पन्हाळकर हे मणचे येथे बस घेऊन गेले व परत खारेपाटण येथे येत असताना दुचाकी चालक एसटीच्या मागच्या टायरजवळ आपटले व अपघात घडला.
यावेळी तुषार सुहास फाटक हा गाडी चालवत होता. तर यशवंत सुहास फाटक हा त्याच्यामागे दुचाकीवर बसला होता. यामध्ये यशवंत याच्या पायाला व मांडीला दुखापत झाली असून तुषार याच्या उजव्या पायाला व तोंडाच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातग्रस्त युवकांना तातडीने खासगी गाडीने खारेपाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मंडावरे यांनी प्राथमिक उपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कणकवली येथे पाठविले.
या अपघाताची माहिती मिळताच कणकवली आगारप्रमुख नीलेश लाड यांनी उशिरा सायंकाळी खारेपाटण बसस्थानकाला भेट देत अपघाताची माहिती घेतली. या अपघातात एसटीचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी दुचाकीचे नुकसान झाले आहे. या अपघाताबाबत खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार प्रतीक जाधव अधिक तपास करीत आहेत.