भुईबावडा-रिंगेवाडी येथे एसटी बस कलंडली, चार प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 11:47 AM2024-09-19T11:47:59+5:302024-09-19T11:48:27+5:30
बसमध्ये होते ६५ प्रवासी
वैभववाडी : भुईबावडा रिंगेवाडी येथे समोरून येणाऱ्या ट्रकला बाजू देताना पुणे-पणजी ही एसटी बस उलटली. यात चार प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी (दि.१७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. महिनाभरातील हा एसटीचा दुसरा अपघात आहे.
जखमींमध्ये आनंदा बबन सोनुले (६६, वैभववाडी), सुजाता बाबू जाधव (४०, कासार्डे), पुष्पा नारायण कांबळे (५५, सैतवडे गगनबावडा), संतोष शंकर नेने(३४, कोकिसरे) यांचा समावेश आहे.
पुण्याहून पणजीला निघालेली एसटी बस (क्रमांक एमएच१४, केक्यू- ५९३७) भुईबावडा घाट उतरून वैभववाडीकडे येत होती. भुईबावडा रिंगेवाडी पुलानजीक बस आली असताना समोरून आलेल्या ट्रकला बाजू देण्यासाठी बस चालकाने वेग कमी करीत गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाजूपट्टीवरून गाडी घसरत रस्त्याबाहेर जाऊन कलंडली.
अपघाताची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यकांत पाटील हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. याशिवाय सहायक पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, हवालदार शैलेश काबंळे, हरेष जायभाय, अजय बिलपे, जितेंद्र कोलते आदी अपघातस्थळी दाखल झाले होते. अपघाताची माहिती मिळताच रिंगेवाडी पोलिस पाटील मनोज चव्हाण, मनोज गुरव, जितेंद्र चव्हाण, उमेश देसाई, महेंद्र देसाई या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन अन्य वाहन चालक व पोलिसांच्या मदतीने सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
एक गंभीर, तिघे किरकोळ जखमी
बस कलंडताच बसमधील प्रवाशांनी एकच गोंधळ सुरू केला. बस वाहकाच्या बाजूवर कोसळल्यामुळे दरवाजा बंद झाला होता. त्यामुळे बसमधून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती. स्थानिक ग्रामस्थांनी आपत्कालीन खिडकीसह बसची पुढील काच फोडून बसमधील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. तसेच जखमींना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.