कलंबिस्तजवळ एसटी बस उलटली, सुदैवाने जीवितहानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 04:37 PM2020-09-02T16:37:18+5:302020-09-02T16:44:36+5:30
सावंतवाडीहून वेर्ले येथे जाणारी एसटी बस वेर्ले गावातून परतून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना अपघात झाला. कलंबिस्तजवळ वेर्ले सीमेलगत बस रस्ता सोडून बाहेर गेली आणि उलटली. यात सुदैैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. या एसटीमध्ये चालक-वाहक असे मिळून सहा जण होते.
सावंतवाडी : सावंतवाडीहून वेर्ले येथे जाणारी एसटी बस वेर्ले गावातून परतून सावंतवाडीच्या दिशेने येत असताना अपघात झाला. कलंबिस्तजवळ वेर्ले सीमेलगत बस रस्ता सोडून बाहेर गेली आणि उलटली. यात सुदैैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी एसटीचे मोठे नुकसान झाले आहे. या एसटीमध्ये चालक-वाहक असे मिळून सहा जण होते. हा अपघात सोमवारी दुपारी एकच्या सुमारास झाला.
नेहमीप्रमाणे सावंंतवाडी एसटी आगाराची सकाळची बस वेर्लेच्या दिशेने गेली होती. तेथून ही बस परतत असतना वेर्ले सीमेलगत कलंबिस्त गावच्या हद्दीत बस रस्त्याच्या बाजूला गेली आणि सरळ शेतात उलटली. चालकाला समजण्याच्या आतच हा सर्व प्रकार घडला. त्यामुळे प्रवाशांनी आरडाओरड केली. यावेळी बसमध्ये चालक-वाहक यांच्यासह चार प्रवासी प्रवास करीत होते.
हे सर्वजण बसमध्ये अडकले होते. त्याना नंतर बाहेर काढण्यात आले. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात झाल्याची माहिती समजताच वेर्ले सरपंच सुरेश राऊळ, उपसरपंच सुभाष राऊळ, सामाजिक कार्यकर्ते आनंद राऊळ, कलंबिस्त ग्रामस्थ तसेच वेर्ले ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. उशिरापर्यंत अपघाताबाबत पोलिसात नोंद झाली नव्हती.