एसटी महामंडळ पुन्हा कुरियर सेवा करणार सुरू !उत्पन्न वाढीसाठी नवनवीन उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 05:05 PM2020-08-26T17:05:07+5:302020-08-26T17:07:54+5:30
'प्रवाशांच्या सेवेसाठी ' हे ब्रीद घेऊन तसेच प्रवासी वाहतूक हे मुख्य उद्दीष्ट ठेवत सुरू झालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा सध्या वाढत्या तोट्यामुळे अडचणीत आहे. बंद झालेली कुरियर सेवाही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
सुधीर राणे
कणकवली : 'प्रवाशांच्या सेवेसाठी ' हे ब्रीद घेऊन तसेच प्रवासी वाहतूक हे मुख्य उद्दीष्ट ठेवत सुरू झालेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा सध्या वाढत्या तोट्यामुळे अडचणीत आहे . हे महामंडळ कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊननंतर आणखीनच अडचणीत सापडले आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी उत्पन्न वाढीची गरज आहे. त्यासाठी महामंडळांच्यावतीने नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असून बंद झालेली कुरियर सेवाही पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून यापूर्वीही कुरियर सेवा सूरु करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता. एखाद्या बसस्थानकावर बुकिंग केल्यानंतर ग्राहकाला आवश्यक त्या ठिकाणच्या बसस्थानकावर पार्सले पोहोच होत असत.त्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायीकांची मोठी सोय झाली होती.
कालांतराने ही पार्सल सेवा महामंडळाने खासगी कंपनीकडे दिली .मात्र, तरीही राज्य परिवहन महामंडळाला त्या सेवेमधून अपेक्षित यश न मिळाल्याने ती बंद करण्यात आली होती . त्यामुळे अनेक व्यावसायिकांची गैरसोय होत होती. त्यासाठी एसटीने पुन्हा ही सेवा सुरू करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत होती.
आता तोट्यात असलेल्या महामंडळाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातच अलीकडे कोरोनाचा समूह संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे एसटीची सेवा बंद ठेवावी लागली होती. त्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती आणखीनच कोलमडली आहे.
त्यासाठी लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर एसटीच्या माध्यमातून प्रवासी वाहतुकी बरोबरच मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. पुढील काळात शासकीय धान्य , रोपे अथवा शासकीय मालाची वाहतूकही एसटीच्या माध्यमातून करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच पुन्हा एकदा कुरिअर सेवा सुरू करण्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या विचाराधीन असून लवकरच याबाबत कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
आता खेडोपाड्यात पूर्वी प्रमाणेच प्रवाशांना सेवा देण्याचा प्रयत्न हळूहळू महामंडळाने सुरू केला आहे. त्यासाठी विविध मार्गावर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाची भीती पूर्णतः लोकांच्या मनातून गेली नसल्याने प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद अनेक मार्गावर गाड्याना मिळत नाही. याउलट काही मार्गावर गाड्यांची संख्या कमी असल्याने एका गाडीत २२ पेक्षा जास्त प्रवाशी बसवावे लागत आहेत. त्यामुळेही चालक, वाहकांसमोर अडचणी निर्माण होत आहेत.
महामंडळाच्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भविष्यात प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूकही वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी महामंडळाने मालवाहतुकीच्या ट्रकची संख्या १ हजारपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
अलिकडेच नवीन ६०५ प्रवासी वाहतुकीच्या गाड्यांचे मालवाहतुकीत रूपांतरण करण्यासही मान्यता दिली आहे . या एक हजार गाड्यांच्या माध्यमातून वर्षाला एक हजार कोटी रुपये एवढे उत्पन्न मिळविण्याच्या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाचा प्रयत्न आहे.
अन्य मालवाहतूक दरापेक्षा एसटी महामंडळाचे मालवाहतुकीचे दर कमी आहेत. त्याचाही फायदा महामंडळाला होत आहे. त्याबरोबरच परत कुरियर सेवा सुरू केल्यास महामंडळाला उत्पन्न वाढीचे एक साधन उपलब्ध होणार आहे.
परिवहन मंत्र्यांचा दुजोरा !
राज्य परिवहन महामंडळाकडून पूर्वी प्रवासी वाहतुकीसोबत कुरिअर सेवाही देण्यात येत असे. कालांतराने ही सेवा बंद पडली होती. आता तोट्यातील महामंडळ फायद्यात आणण्यासाठी आम्ही विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत एसटीकडून पुन्हा एकदा कुरिअर सेवा सुरु करण्यात येईल. अशी माहिती सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी कणकवली बसस्थानक परिसर पहाणीच्यावेळी दिली. त्यामुळे भविष्यात एसटीची कुरियर सेवा सुरू होणार की नाही ? या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे.