एस.टी.ला 42 लाखांचे उत्पन्न
By admin | Published: March 15, 2017 08:14 PM2017-03-15T20:14:09+5:302017-03-15T20:14:16+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी व देवगड तालुक्यातील श्री कुणकेश्वर यात्रेच्या माध्यमातून
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 15 - सिंधुदुर्ग जिल्ह्यात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी व देवगड तालुक्यातील श्री कुणकेश्वर यात्रेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग एस.टी. विभागाला 42 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आंगणेवाडी यात्रेतुन 23 लाख 94 हजार तर कुणकेश्वर यात्रेच्या माध्यमातून मिळालेल्या 18 लाख 38 हजार रुपयांच्या उत्पन्नाचा यात समावेश आहे.
या यात्रोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे तसेच इतर ठिकाणांहुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी एस.टी. प्रशासनाने चोख नियोजन केले होते. या दोन्ही यात्रेसाठी नियमित गाड्यांबरोबरच जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तसेच इतर सुविधाही देण्यात आल्या होत्या.
आंगणेवाडी येथील श्री भराड़ी देवीच्या यात्रेसाठी सिंधुदुर्ग एस.टी. विभागाने 117 गाड्यांचा वापर करीत 1833 फेऱ्यांच्या माध्यमातून 1लाख 1 हजार प्रवाशांची वाहतूक केली. या सर्व गाड्यानी 53, 986 किलोमीटर अंतर प्रवास केला. यातून या विभागाला 23 लाख 94 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
या उत्पन्नात मालवण आगाराला 7 लाख 62 हजार, कणकवली आगाराला 6 लाख 29 हजार, देवगड आगाराला 1 लाख 93 हजार , कुडाळ आगाराला 6 लाख 56 हजार तर वेंगुर्ले आगारातून 39 हजार रुपयांच्या मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश आहे.
कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी 90 गाड्यांच्या माध्यमातून 1646 फेऱ्यांमधुन प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. या सर्व गाड्यांचा 57 हजार 715 किलोमीटर अंतर प्रवास झाला. यातून मालवण आगाराला 3 लाख 61 हजार, कणकवली आगाराला 6 लाख 97 हजार, देवगड आगाराला 5 लाख 94 हजार, विजयदुर्ग आगाराला 72 हजार, कुडाळ आगाराला 54 हजार , वेंगुर्ले आगाराला 60 हजार असे एकूण 18 लाख 38 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. एस.टी. च्या चांगल्या नियोजनामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांची गैरसोय टळली.