एस.टी. दरीत कोसळून नऊ जखमी

By admin | Published: February 23, 2016 12:48 AM2016-02-23T00:48:39+5:302016-02-23T00:48:39+5:30

खारेपाटण येथील घटना : कंटेनर चालकाने हुलकावणी दिल्याने अपघात

S.T. Nine injured in collapse in valley | एस.टी. दरीत कोसळून नऊ जखमी

एस.टी. दरीत कोसळून नऊ जखमी

Next

खारेपाटण : मुंबई-विजयदुर्ग एस. टी. बस (एमएच २०-२१३६)ला खारेपाटण येथील टाकेवाडी- कुंभारदेव मंदिरानजीक गोसावीवाडी फाटा येथे समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस सुमारे १५ फूट खोल दरीत कोसळली. यात चालक व वाहकासह नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी पहाटे ५.२५ च्या दरम्यान झाला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, मुंबईवरून विजयदुर्गला येणारी प्रवासी एसटी बसचे चालक श्रीनाथ एकनाथ पडेलकर (रा. तिर्लोट आंबेरी, विजयदुर्ग) व वाहक गणेश कीर हे प्रवाशांना घेऊन येत होते. खारेपाटण-टाकेवाडी येथे एका अवघड वळणावर ही बस आल्यानंतर समोरून येणाऱ्या कंटेनरचालकाने हुलकावणी दिल्यामुळे बस चालकाचा बसवरील ताबा सुटून एसटी बस सुमारे १५ फूट दरीत कोसळली. साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना क्षणात काय झाले कळेना.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये वासुदेव गोविंद पावसकर (वय ५८, चिपळूण), चंद्रकांत अनंत पडेलकर (५०, रा. पडेल), नाऊ बाळू मठकर (६७, रा. नाटळ), एकनाथ विठ्ठल पुजारी (५२, रा. पुरळ), नारायण शंकर चव्हाण (७७, रा. मुटाट), पूर्णिमा चंद्रकांत पडेलकर (रा. पडेल), प्रभावती मण्यार (रा. नडगिवे), चालक श्रीनाथ पडेलकर, वाहक गणेश कीर हे जखमी झाले असून, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सर्व जखमी प्रवाशांना पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर)

खारेपाटण ग्रामस्थांची धाव
अपघाताचे वृत्त खारेपाटणमध्ये समजताच तेथील ग्रामस्थांनी धाव घेतली व जखमींना तत्काळ बाहेर काढले. यामध्ये भाऊ राणे, बबन तेली, सचिन शिंदे, गणेश घेवडे, राजू वरुणकर, डॉ. बोडके, मनोज गुरव, महेश पाटील, बाबा शेट्ये, अण्णा तेली, आदींनी मदतकार्य केले.
पारिजात टॅ्रव्हल्सकडून मदत
पारिजात ट्रॅव्हल्सने मुंबईवरून कणकवलीच्या दिशेने जाणारी आपली बस थांबवून जखमी प्रवाशांना एस. टी.मधून बाहेर काढण्यास मदत केली. ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने स्वत: खोल दरीत उतरून प्रवाशांना बाहेर काढले. तसेच आपल्या गाडीतील शिडीचा वापर जखमींना मदत करण्यासाठी केला.
एसटीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी
मुंबई-विजयदुर्ग बसच्या अपघाताचे वृत्त समजताच एसटीचे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले. नुकसान तसेच अपघाताविषयी पाहणी केली. तसेच घटनास्थळी पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

Web Title: S.T. Nine injured in collapse in valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.