सिंधुदुर्ग : विद्यापिठ अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्याना मिळणार एस टी पास सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 03:42 PM2018-10-27T15:42:01+5:302018-10-27T15:44:28+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना देण्यात येणाऱ्या बस प्रवास भाड्याच्या पास सवलत योजनेमध्ये महत्वाकांक्षी बदल करण्यात आला आहे़ या बदलानुसार १९८६ पूर्वीच्या व नंतर सुरू झालेल्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पास सवलत मिळणार आहे़.
कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विविध सामाजिक घटकांना देण्यात येणाऱ्या बस प्रवास भाड्याच्या पास सवलत योजनेमध्ये महत्वाकांक्षी बदल करण्यात आला आहे़ या बदलानुसार १९८६ पूर्वीच्या व नंतर सुरू झालेल्या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पास सवलत मिळणार आहे़. त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत विद्यार्थीनींना बारावीपर्यंत मोफत पास सेवा उपलब्ध झाली आहे. अशी माहिती सिंधुदुर्ग एस टी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली़
कणकवली येथील एस टी विभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी अभिजित पाटील, कर्मचारी वर्ग अधिकारी एल.आर. गोसावी, दिलीप साटम, प्रकाश नेरूरकर, मोहनदास खराडे आदी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रकाश रसाळ म्हणाले, एसटीच्या विविध पास सवलतींमध्ये २७ सवलती काही सुधारणा करून ९ आॅक्टोबर २०१८ च्या परिपत्रकानुसार शासनाने जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थीनींना बारावीपर्यंत मोफत प्रवास, नव्याने १९८६ नंतर सुरू झालेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पास सवलत, तंत्र व व्यावसायीक पास सवलत, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त व्यक्तींना वातानुुकुली बस सेवा, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींना ८ हजार किलोमिटरपर्यंत प्रवास, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार लाभार्थींना ८ हजार किलोमिटर प्रवास १०० टक्के सवलत, स्वातंत्र्य सैनिकाना १०० टक्के सवलत, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देऊन ४ हजार किलोमिटरपर्यंत ५० टक्के सवलत, क्षयरोग, कुष्ठ रोग, कर्करोग ७५ टक्केपर्यंत प्रवास भाड्यात सवलत देण्याचा निर्णय एस टी ने घेतल्याचे प्रकाश रसाळ यांनी सांगितले़
सिकलसेल, हिमोफेलिया, एचआयव्ही बाधीत व डायलेसीस रूग्णांसाठी १०० टक्के पास सवलत, राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार प्राप्त व्यक्तींना १०० टक्के सवलत, ४० टक्के पेक्षा जास्त अंध व अपंग व्यक्तींसाठी ७५ टक्के सवलत, अंध व अपंग व्यक्तीं पैकी परावलंबी असणाऱ्या व्यक्तींच्या सोबत असलेल्या साथीदारास ५० टक्के सवलत, अधिस्विकृतीधारक पत्रकारास शिवशाही व सर्व एसटी बसेसमध्ये १०० टक्के सवलत, माजी आमदारांना १०० टक्के सवलत, शासन पुरस्कृत खेळामध्ये विजेते स्पर्धक ३३ टक्के सवलत, विद्यार्थी जेवनाचे डब्बे १०० टक्के सवलत, विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टी मुळ गावी जाणे, आजारी आई वडीलांना भेटणे, कॅम्पला जाणे ५० टक्के सवलत, विद्यार्थ्यांना नैमत्तिक करारावर सहल सवलत ५० टक्के, पंढरपुर, आषाढी, कार्तिकी एकादशीला शासकीय पुजेचा मान मिळालेल्या वारकरी दाम्पत्याला १०० टक्के सवलत मिळणार असल्याचे प्रकाश रसाळ यांनी सांगितले.
रेस्क्यू होम मधील मुलांना वर्षातून एकदा ६६.६७ टक्के एवढी सहलीकरता सवलत, मुंबई पुर्नवसन केंद्रातील मानसीक दृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांना ६६.६७ टक्के सवलत, अपंग गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यांना १०० टक्के सवलत, आदीवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार वर्षभर १०० टक्के प्रवास सवलत, कौशल्य सेतू अभियानांतर्गत माध्यमिक शालांत परिक्षा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यााना १११ प्रशिक्षण केंद्रात ६ महिन्यांचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासात ६६.६७ टक्के सवलत सरकारने जाहीर केली आहे़ अशा २७ योजना प्रवास सवलतीच्या सिंधुदुर्गात राबविल्या जात आहेत. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपापल्या तालुका आगारामध्ये संपर्क साधून या सवलतींची अधिक माहिती करून घ्यावी व त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाश रसाळ यांनी केले आहे.