कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 02:29 PM2020-09-12T14:29:41+5:302020-09-12T14:33:07+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी. अशी मागणी एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी. अशी मागणी एसटीचेसिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात प्रकाश रसाळ यांची भेट घेण्यात आली. यावेळी कणकवली तालुका भाजपा युवा मोर्चाचे ग्रामीण तालुकाध्यक्ष नितीन पाडावे, शहर तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनय सावंत, जिल्हा सरचिटणीस पप्पू पुजारे, सर्वेश दळवी, शहर अध्यक्ष सागर राणे, ओंकार राणे आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील एसटी सेवा २३ मार्चपासून बंद आहे.लॉकडाऊन संपून आता अनलॉक सुरू झाले आहे. काही भागात एसटी सेवा सुरु झाली आहे. ग्रामीण भागातील जनता प्रवासासाठी एसटी वरच अवलंबून आहे. त्यामुळे प्रवासासाठी खाजगी वाहनांसाठी जनतेला आर्थिक भुर्दंड बसत आहे.
जनतेच्या सोयीसाठी ग्रामीण मार्गावरील किमान काही फेऱ्या सुरु करण्यात याव्यात. असेही या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान , यावेळी चर्चेअंती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी ४ दिवसांत एसटीच्या फेऱ्या सुरु करण्याचे आश्वासन दिले.