एसटी कामगारांनी कुटुंबीयांसह केले आक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 03:14 PM2020-11-10T15:14:42+5:302020-11-10T15:15:54+5:30
Statetransport, diwali, kankavli, sindhudurnews एसटी कर्मचाऱ्यांचे दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे थकित वेतन मिळावे. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी. अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने आक्रोश आंदोलन सोमवारी करण्यात आले. या आंदोलनात कामगारांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.
कणकवली : एसटी कर्मचाऱ्यांचे दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे थकित वेतन मिळावे. तसेच महागाई भत्त्याची थकबाकी व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सण उचल मिळावी. अशा विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने आक्रोश आंदोलन सोमवारी करण्यात आले. या आंदोलनात कामगारांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.
एसटी कामगार संघटनेचे प्रदेश सचिव दिलीप साटम, विभागीय अध्यक्ष सुरेंद्र मोरजकर, विभागीय सचिव विनय राणे, विभागीय खनिजदार अनिल नर, रवींद्र भिसे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी हे आंदोलन करण्यात आले.
कोरोनाच्या आपत्ती काळात एसटी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा बजावत आहेत. तसेच सध्या मुंबई बेस्टची प्रवासी वाहतूकही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत करीत आहेत. त्यामध्ये बरेच कर्मचारी बाधित झालेले असून सुमारे ७४ कर्मचारी मृत झालेले आहेत.
कोरोना कालावधीत कामगार प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतानाही कामगारांना ऑगस्ट २०२० पासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता व सण उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य केलेले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०१९ पासून वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे. परंतु एसटी कामगारांना तो अद्याप लागू केलेला नाही. त्याचप्रमाणे सन २०१८ ची वाढीव २ टक्क्यांची तीन महिन्यांची थकबाकी व सन २०१९ ची ३ टक्क्यांची नऊ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकीही एसटी कामगारांना अद्याप मिळालेली नाही. त्याचप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये सण उचल लागू केलेली आहे. परंतु एसटी कामगारांना अद्यापपर्यंत ती लागू केलेली नाही.
उपासमार थांबविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत
एसटी कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचे वेतन नियत देय तारखेस देण्याची जबाबदारी कायद्याने एसटी प्रशासनाची असतानाही त्यांनी वेतन दिलेले नाही. त्यामुळे एसटी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांची वेतनाविना होणारी उपासमार थांबविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. अशी मागणी एसटी कामगार संघटनेकडून करण्यात येत आहे.