मालवणात पॅनकार्डधारकांचा ठिय्या
By admin | Published: October 27, 2016 10:31 PM2016-10-27T22:31:57+5:302016-10-27T23:22:50+5:30
ठेवीदार आक्रमक : परतावा मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा, कंपनीच्या हॉटेलमध्ये पर्यटकांना रोखले
मालवण : पॅनकार्ड क्लब्ज लिमिटेड या कंपनीत जिल्ह्यातील ठेवीदारांची परतावा मुदत संपली असतानाही परतावा न देण्यात आल्याने आक्रमक बनलेल्या मालवणातील ठेवीदारांनी गुरुवारी सकाळपासून हॉटेल सागर किनारा येथे बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात ठेवीदार व मार्केटींग एजंटही सहभागी झाले आहेत. जोपर्यंत ‘पॅनकार्ड’कडून रक्कम परतावा स्वरुपात दिली जाणार नाही, तोपर्यंत बेमुदत ठिय्या सुरूच राहील, असा एकमुखी निर्धार ठेवीदारांनी केला आहे.
ठेवीदारांनी पॅनकार्डविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आम्हांला तारखा नको, जमा केलेली रक्कम मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ठेवीदारांनीनी कंपनीच्या दोन्ही हॉटेलमध्ये ठाण मांडले. यावेळी हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या पर्यटक व ग्राहकांना प्रवेश करण्यास अटकाव केला जात होता. सायंकाळी उशिरापर्यंत कंपनीकडून ठोस भूमिका न घेतल्याने आंदोलन सुरुच होते. पॅनकार्डने ठोस भूमिका घेतल्यास व परतावा न दिल्यास पैसे मिळेपर्यंत दरदिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ठेवीदारांनी स्पष्ट केले. दोन महिन्यांपूर्वी सावंतवाडीतील ठेवीदारांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्त्वाखाली सावंतवाडी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवरही गुन्हे दाखल झाले होते. त्यात काही ठेवीदारांना आपली रक्कमही मिळाली होती. त्यामुळे पॅनकार्डच्या विरोधात आता सर्वच जिल्हावासीय आक्रमक होताना आढळत आहेत. (प्रतिनिधी)
४00 ठेवीदार सहभागी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीस हजारांहून अधिक ठेवीदारांच्या सुमारे ४० कोटींच्या ठेवी आहेत. मात्र गेल्या दीड वर्षापासून कंपनीचे सर्व व्यवहार व परतावा रक्कम बंद झाल्याने ठेवीदारांसह मार्केटींग एजंट हवालदिल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यात ठेवीदारांनी तीव्र आंदोलन केले होते.
४0 कोटींहून अधिकची गुंतवणूक
यावेळी अवधूत चव्हाण, राजा गावकर, नाना कुमठेकर, प्रमोद नाईक, मेघा गावकर, आशू परब, एम. एस. कडू, डी. के. चव्हाण. ए. एम. तळवडेकर यांनी ठिय्या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. गेली काही वर्षे पॅनकार्ड समूहाच्या माध्यमातून मार्केटींग एजंटद्वारे जिल्ह्यातील सुमारे ६० ते ७० टक्के ग्राहकांनी ४० कोटींहून अधिकची गुंतवणूक केली आहे. अनेक ठेवीदारांची ठेव मुदत तारीख उलटून गेली तरी ठेवीच्या रकमा गेल्या दीड वर्षापासून मिळत नाहीत. कोट्यवधी रकमेचा परतावा मिळत नसल्याने ग्राहकांचा संताप वाढत गेला. कंपनीतील वरिष्ठांशी संपर्क होत नसल्याने संतप्त ठेवीदारांनी आंदोलन छेडले आहे, असे सांगितले.