कणकवलीतील स्टॉल हटाव मोहीम तूर्तास स्थगित, विक्रेत्यांना दिली एक महिन्याची मुदत

By सुधीर राणे | Published: April 29, 2023 05:11 PM2023-04-29T17:11:38+5:302023-04-29T17:18:27+5:30

महामार्ग प्राधिकरणची कारवाई थांबल्यानंतर उड्डाणपूलाखाली पुन्हा एकदा स्टॉल धारकांनी बस्तान मांडले होते

Stall removal campaign in Kankavli suspended for now | कणकवलीतील स्टॉल हटाव मोहीम तूर्तास स्थगित, विक्रेत्यांना दिली एक महिन्याची मुदत

कणकवलीतील स्टॉल हटाव मोहीम तूर्तास स्थगित, विक्रेत्यांना दिली एक महिन्याची मुदत

googlenewsNext

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावरील कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील उड्डाणपुलाखाली अनधिकृत बसलेल्या स्टॉल धारकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पोलीस बंदोबस्तात मार्च महिन्यात हटविले होते. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणची कारवाई थांबल्यानंतर उड्डाणपूलाखाली पुन्हा एकदा स्टॉल धारकांनी बस्तान मांडले होते. याच पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणने शनिवारी दुपारच्या सुमारास पुन्हा  स्टॉल हटाव मोहिमेला सुरुवात केली. मात्र, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्यामध्यस्थीने आणि स्टॉल धारकांच्या सलोख्याने स्टॉल हटाव मोहीम तूर्तास थांबवण्यात आली आहे.

शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथे उड्डाणपुलाखाली अनधिकृत रित्या बसलेल्या स्टॉल धारकांना हटविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणने पोलिसांच्या बंदोबस्तात मोहीम  सुरु केली होती. त्यामुळे काही वेळ शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी सहकाऱ्यांसह या मोहिमेला अटकाव केला. गोरगरीब जनता या ठिकाणी स्वतःचे पोट भरत असल्याचे सांगत ही स्टॉल हटाव मोहीम थांबविण्याची मागणी केली. तसेच उड्डाणपुलाखाली उद्यान अथवा इतर कोणत्या गोष्टी तुम्ही करणार आहात ते सांगा असे अधिकाऱ्यांना सांगितले.  त्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी स्टॉल धारकांशी चर्चा केली. 

यात स्टॉल धारकांनी सध्या हंगामाचा कालावधी असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी स्टॉल लावू द्या असे सांगितले असता, महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना एक महिन्याचा कालावधी दिला आहे. परंतु एक महिन्यानंतर जर स्टॉल धारकांनी स्वतःहून स्टॉल न हटवल्यास महामार्ग प्राधिकरण पुन्हा एकदा स्टॉल हटाव मोहीम राबवणार असल्याचे सांगितले.

तसेच स्टॉल धारकांनी एक महिन्यानंतर स्वतःहून स्टॉल हटवणार असे लेखी पत्र महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. त्यामुळे स्टॉल हटाव मोहीम तूर्तास थांबविण्यात आली आहे. यावेळी  महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता रुपेश कांबळे, पोलिस उपनिरीक्षक बापू खरात,अनिल हाडळ यांच्यासह दंगल नियंत्रण पथक तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Stall removal campaign in Kankavli suspended for now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.