स्थायी समिती सभा : सत्ताधारी-विरोधी सदस्यांमध्ये जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 03:22 PM2021-01-27T15:22:56+5:302021-01-27T15:25:32+5:30
vengurla sindhdudurg: वेंगुर्ला सभापतींच्या राजीनामा नाट्याबाबत झालेल्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. आपल्याच पक्षाच्या सभापतींच्या राजीनाम्यासाठी संजय पडते यांनी हा दबाव अाणला, असा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी स्थायी सभेत केला. वेंगुर्ला सभापतींच्या राजीनामा नाट्याबाबत झालेल्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. आपल्याच पक्षाच्या सभापतींच्या राजीनाम्यासाठी संजय पडते यांनी हा दबाव अाणला, असा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी स्थायी सभेत केला.
सिंधुदुर्ग : वेंगुर्ला सभापतींच्या राजीनामा नाट्याबाबत झालेल्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. आपल्याच पक्षाच्या सभापतींच्या राजीनाम्यासाठी संजय पडते यांनी हा दबाव अाणला, असा आरोप गटनेते रणजित देसाई यांनी स्थायी सभेत केला.
त्या सभापतींचा राजीनामा टपालातून आला. मात्र, त्याची पडताळणी आपल्या समक्ष करावी, असे लेखी पत्र त्यांना दिले होते. मात्र, त्या रजेवर असल्याने समक्ष आल्या नाहीत अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षांनी देताच विरोधी सदस्यांच्या आरोपाचा मुद्दा फोल ठरला. जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्षा समीधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती बाळा जठार, माधवी बांदेकर, शारदा कांबळे, आदी पदाधिकारी, तर गटनेते रणजित देसाई, संतोष साटविलकर, संजना सावंत, अमरसेन सावंत, दादा कुबल तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी राजेंद्र पराडकर, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
वेंगुर्ला सभापती शिवसेनेच्या असून, त्यांनी या पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सादर केला होता; हा राजीनामा तत्काळ मंजूर करावा म्हणून संजय पडते आक्रमक झाले. मात्र, या राजीनाम्याबाबत एवढी आक्रमकता का? याबाबत रणजित देसाई यांनी विचारल्याने चांगलीच जुंपली.
ठेकेदारांच्या उपोषणाचे स्थायी समितीत पडसाद
सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही आणि प्रशासकीय व तांत्रिक मान्यता असतानाही साळगाव, माणगाव रस्त्यावरील संरक्षक भिंतीच्या कामाचा कार्यारंभ आदेश मिळाला नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार रूपेश धुरी यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषणास प्रारंभ केला आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कामामुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे. याबाबत सभापती बाळा जठार, रणजित देसाई, संजना सावंत आदी सदस्यांनी आक्रमक होत सभागृहाचे लक्ष वेधले.
मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी अधिकारी चुकीचे काम करीत असतील व यात जिल्हा परिषदेची बदनामी होत असेल तर कारवाई करू, अशी तंबी सभागृहातच खातेप्रमुखांना दिली. त्यानंतर लागलीच कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी आजच मक्ता मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश देऊ, असे सांगितल्याने सर्वच सदस्य आक्रमक झाले. उपोषणानंतर आता मक्ता मंजूर करून कार्यारंभ आदेश देत असाल तर संबंधित ठेकेदाराला उपोषणाची वेळ का आली? या दिरंगाईबद्दल अखेर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनीही कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारला.