देवगडमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करा!, नितेश राणेंची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी
By सुधीर राणे | Published: August 23, 2022 03:40 PM2022-08-23T15:40:10+5:302022-08-23T15:41:00+5:30
कोकण किनारपट्टीच्या एकूण ७२० कि.मी. लांबीपैकी सुमारे १२१ कि.मी. लांबी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे.
कणकवली: देवगड येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करावे अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एका पत्राद्वारे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, कोकण किनारपट्टीच्या एकूण ७२० कि.मी. लांबीपैकी सुमारे १२१ कि.मी. लांबी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी लगतच्या ८७ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी प्रमुख व्यवसाय आहे. जिल्ह्यामध्ये एकूण मच्छीमारांची लोकसंख्या ३२०१७ आहे. त्याचप्रमाणे विजयदुर्ग, देवगड, मालवण, वेंगुर्ले याठिकाणी बंदरे व मच्छीची उतरणावळ करणारे ३४ धक्के आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक कोल्ड स्टोरेजेस असून त्याद्वारे मच्छीवर प्रक्रिया केली जाते. असे असूनही जिल्हयामध्ये मत्स्य महाविद्यालय नसल्यामुळे येथील तरुणांना आधुनिक मत्स्य व्यवसाय शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.
देवगड तालुक्यामध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्यात यावे अशी जिल्ह्यातील जनतेची बरेच वर्षांची मागणी आहे. त्या ठिकाणी मत्स्य व्यवसाय महाविद्यालयीन अभ्यासक्रमासाठी आवश्यक असे योग्य, खारे, निमखारे व गोड्या पाण्याचे स्त्रोत्र उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आवश्यक पुरेशी जागा, दळणवळणाच्या सोई तसेच आनंदवाडी सारखा मोठा प्रकल्प प्रगती पथामध्ये आहे. याठिकाणी महाविद्यालय सुरू झाल्यास जिल्ह्यातील तरूणांना नोकरी व व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरेट यासारख्या पदव्या प्राप्त करणे सोईचे होईल. त्यामुळे जनतेच्या मागणीनुसार देवगड येथे मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणीला त्वरीत मंजूरी द्यावी असे या पत्रात म्हटले आहे.