गणेशोत्सवाला थाटात प्रारंभ

By admin | Published: September 6, 2016 01:42 AM2016-09-06T01:42:32+5:302016-09-06T01:43:40+5:30

जिल्ह्यात भक्तिमय वातावरण : ६६ हजार ५३४ घरगुती तसेच ३७ सार्वजनिक गणरायांचे पूजन

Start of Ganesh Festival | गणेशोत्सवाला थाटात प्रारंभ

गणेशोत्सवाला थाटात प्रारंभ

Next

कणकवली : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषात सोमवारी सिंधुदुर्गात ६६ हजार ५४५ ठिकाणी घरगुती तर ३७ ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या गणरायाची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या आनंदोत्सवात लहान थोर दंग झाल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.
सिंधुदुर्गसह कोकणात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गणेशोत्सवाची तयारी गेल्या एक महिन्याहून अधिक काळ सुरु होती. भाद्र्रपद महीना सुरु झाला आणि या तयारीने आणखीनच वेग घेतला होता. अखेर भाद्र्रपद शुध्द चतुर्थीला म्हणजेच सोमवारी गणरायाची भावपूर्ण वातावरणात अनेक घरात स्थापना करण्यात आली.
गणेशचतुर्थीच्या दिवशी होणारी तारांबळ टाळण्यासाठी काही ठिकाणी रविवारीच श्री गणेश मूर्ती घरी आणून ठेवण्यात आली होती. तर काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात सोमवारी सकाळी गणरायाचे आगमन झाले. सकाळपासूनच गणरायाच्या पूजेसाठी अनेक घरात लहान थोर मंडळींची लगबग सुरु होती.
श्री गणेश मूर्तींची स्थापना झाल्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीही करण्यात आली. उकडीच्या एकवीस मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करण्यात आला.
त्यानंतर सर्वांनी नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण केला. तर सायंकाळी ही पुन्हा पूजन, आरती करण्याबरोबरच भजन तसेच अन्य धार्मिक विधि करण्याचा परिपाठ सुरु झाला आहे. तो श्री गणेश मूर्ती विसर्जनापर्यंत सुरु रहाणार आहे.
प्रत्येक घरात पारंपरिक पध्दतीने तसेच प्रत्येकाच्या रुढीनुसार दीड, पाच, सात, नऊ, अकरा, सतरा, एकोणीस, एकवीस, बेचाळीस असा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे त्यानिमित्ताने सर्वत्र वातावरण भारावलेले राहणार आहे.
त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. प्रशासन ही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करीत
आहे. (प्रतिनिधी)



मृदंग, तबल्याच्या साथीने आरतीचे स्वर उमटले
सोमवारी घरोघरी गणरायाचे विधिवत पूजन झाल्यानंतर परंपरेप्रमाणे आरती करण्यात आली. तर राजस सुकुमार अशा घरात विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन झाल्यानंतर अगदी आतुरतेने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची वाट पहाणाऱ्या लहान थोर मंडळींचा आनंद गगनात मावेनासा झाला.टाळ, ढोलकी, मृदंग, तबला , हार्मोनियम आदी वाद्यांच्या साथीने सर्वत्र सुमधुर आरतीचे स्वर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक घरात उमटले.

अनेक घरात पुरोहितांच्या उपस्थितीत श्री गणेश मूर्तीची स्थापना तसेच विधिवत पूजन करण्यात आले. अनेक ठिकाणी पुरोहिताना पुजेसाठी आमंत्रण देण्यात आलेले असल्याने यजमानांच्या घरी पूजनाची वेळ साधण्यासाठी सकाळपासूनच अनेक पुरोहितांची लगबग सुरु होती.

Web Title: Start of Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.