रॉक गार्डनमध्ये प्रवेश कर आकारणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 12:49 PM2020-12-29T12:49:31+5:302020-12-29T12:51:37+5:30
Malvan beach tourism sindhudurg-पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रॉक गार्डन येथे म्युझिक फाऊंटन बसविण्यात आल्याने गार्डनमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गार्डनच्या देखरेखीवर खर्चही वाढत चालला असून गार्डनमध्ये प्रवेश कर आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अवघ्या पाच रुपयांत गार्डनमध्ये फेरफटका मारता येणार आहे.
मालवण : पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या रॉक गार्डन येथे म्युझिक फाऊंटन बसविण्यात आल्याने गार्डनमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. गार्डनच्या देखरेखीवर खर्चही वाढत चालला असून गार्डनमध्ये प्रवेश कर आकारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अवघ्या पाच रुपयांत गार्डनमध्ये फेरफटका मारता येणार आहे.
मालवण नगरपालिकेच्या ऑनलाईन सभेत हा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी शुक्रवार (दि. २५)पासून करण्यात आली आहे. यात प्रत्येकी पाच रुपये कर घेण्याचे निश्चित करण्यात आले असून यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार असल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र असणाऱ्या मालवण शहरात नगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या रॉक गार्डनला अलीकडच्या काही वर्षांत पर्यटक मोठी पसंती देत आहेत.
समुद्रकिनारी खडकाळ भागात हिरवळ आणि विविध फुलझाडांनी बहरलेल्या या गार्डनमध्ये नगरपालिकेने रंगीबेरंगी एलईडी लाईट, हायमास्ट मनोरे, छोटेखानी तलाव, मुलांसाठी खेळणी उभारून गार्डनच्या सौंदर्यात भर घातली. कलरफुल लाईट आणि म्युझिकच्या तालावर उडणारे पाण्याचे कारंजे सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. त्यामुळे ते पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
प्रतिव्यक्ती पाच रुपये प्रवेश फी घेणार
सायंकाळी सूर्यास्ताचा नजारा आणि फाऊंटनचा आनंद लुटण्यासाठी सध्या गार्डनमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. रॉक गार्डन देखभाल व दुरुस्तीसाठी दोन वर्षांसाठी ९५ हजार रुपये खर्च होणार आहे. मालवण नगरपालिका ही क वर्ग नगरपालिका असल्याने गार्डनच्या देखभाल-दुरुस्तीचा आर्थिक बोजा नगरपालिकेवर पडतो; म्हणून नाममात्र प्रतिव्यक्ती पाच रुपये प्रवेश फी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.