पर्यटन महोत्सवाला शोभायात्रेने प्रारंभ

By Admin | Published: May 6, 2016 11:43 PM2016-05-06T23:43:42+5:302016-05-07T00:54:42+5:30

चिपळूण नगरीचा प्रतिसाद : पालकमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती

Start of tourism festival with celebration | पर्यटन महोत्सवाला शोभायात्रेने प्रारंभ

पर्यटन महोत्सवाला शोभायात्रेने प्रारंभ

googlenewsNext

चिपळूण : भगवान परशुरामांची भूमी, जगप्रसिद्ध हापूस आंब्याची भूमी, एकीकडे अफाट समुद्र आणि दुसरीकडे सह्याद्रीचा कडा लाभलेली भूमी अशी अनेकविध वैशिष्ट्ये लाभलेल्या कोकणभूमीतील चिपळूणमध्ये रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६ चा दिमाखदार सोहळा शुक्रवारपासून शोभायात्रेने सुरू झाला. पालकमंत्री रवींद्र वायकर, समिती अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण, सभापती स्नेहा मेस्त्री, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे यांची उपस्थिती लाभलेल्या या शोभायात्रेचे नेतृत्त्व तहसीलदार वृषाली पाटील यांनी केले.
ढोल, ताशे, नगारे, लेझीम, खालुबाजा, नाशिकबाजा, झांजपथकाच्या गजरात शोभायात्रेला प्रारंभ झाला. आकर्षक वेषभूषा केलेले नागरिक, विविध चित्ररथ विशेष लक्षवेधी ठरत होते. शोभायात्रा नगर परिषदेजवळ आली असता करंजेश्वरीच्या पालख्या वर उचलण्यात आल्या. येथे पुष्पवृष्टी करण्यात आली.
शोभायात्रेच्या पुढे रांगोळीच्या नेत्रदीपक पायघड्या घातल्या जात होत्या. सनई चौघड्याचे मंजूळ सूर घुमत होते. डीबीजे महाविद्यालयाची कलाकार टीम आपले पथनाट्य सादर करून जनजागृती करत होती. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, नगर परिषद, बाजारपेठमार्गे नाथ पै चौकातून वडनाका, भैरी मंदिरकडून शोभायात्रा पुन्हा पवन तलाव मैदान येथे महोत्सव स्थळी येऊन विसर्जित झाली.
या शोभायात्रेत मुस्लीम समाजाची कोकण सिरत समिती प्रथमच सहभागी झाली होती. त्यांनी रातिब व खालुबाजा सादर केला. शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्राण्यांचे वेश परिधान करून वन्य प्राण्यांचे रक्षण करा हा संदेश दिला. याशिवाय परांजपे हायस्कूल, युनायटेड इंग्लिश स्कूल, दलवाई हायस्कूल, पेढे हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, बांदल हायस्कूल, खेर्डी सती हायस्कूल, सावर्डे हायस्कूल यांचे लेझीम व झांजपथक सहभागी झाले होते. पाग महिला विद्यालयाच्या विद्यार्थिनी विविधरंगी पोशाख घालून सहभागी झाल्या होत्या. विघ्नहर्ता ग्रुपचे नाशिक ढोल व झांजपथक लक्षवेधी ठरले. शंकरवाडी झांजपथकाने थरारक दृश्य सादर केले. जुना कालभैरी रंगमंचतर्फे ७ विविध चित्ररथ सहभागी झाले हाते. या शोभायात्रेत करंजेश्वरी देवीची पालखी ही पारंपरिक पद्धतीने सहभागी झाली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Start of tourism festival with celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.