पेट्रोलिंग सुरू; २0 मदत केंद्रे
By Admin | Published: September 14, 2015 11:51 PM2015-09-14T23:51:48+5:302015-09-14T23:52:08+5:30
दत्तात्रय शिंदे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गाड्यांची तपासणी न करण्याचा निर्णय
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, वाहतुकीस अडथळा व गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले असून सोमवारपासून महामार्गावर पेट्रोलिंग सुरु केले असून २० ठिकाणी पोलीस मदत केंदे्र स्थापन करण्यात आली आहेत, अशी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मदत केंद्रामधून ३५ अधिकारी व १४५ कर्मचारी २४ तास सेवा बजावणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही गणेश भक्ताच्या वाहनांची तपासणी केली जाणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सी.आर.पी.एफ. चे ६० जवान व २५० होमगार्ड जिल्ह्यात दाखल झाले असून आर.सी.पी.चे ४ प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स व शीघ्र कृती दल तैनात केली आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना याविषयी माहिती देण्यासाठी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश पालवे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वजीत कार्इंगडे, पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना दत्तात्रय शिंदे म्हणाले, सिंधुदुर्गात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण आहे. या सणासाठी सिंधुदुर्गातीलच मात्र नोकरीनिमित्त मुुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये वास्तव्यास असणारे गणेशभक्त या निमित्ताने जिल्ह्यात दाखल होतात. या गणेश भक्तांना वाहतुकीदरम्यान कोणतीही गैरसोय अथवा अडथळा होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली असून खारेपाटण ते पत्रादेवी या दरम्यान २० पोलीस मदतकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. यासाठी ३५ अधिकारी व १४५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच महामार्गावर १० जीप ठेवण्यात आल्या असून त्यामार्फत पेट्रोलिंग व ७ मोटारसायकलमार्फत पेट्रोलिंग करण्यात येत आहे.
दहा जीप, सात मोटार सायकल
मदत केंद्रांप्रमाणेच जिल्ह्यात ठिकठिकाणी पेट्रोलिंग मोहिम सुरु करण्यात आले आहे. यासाठी १० जीप व ७ मोटारसायकल तैनात करण्यात आले असून महामार्गाप्रमाणेच घाटामार्गामध्येही पेट्रोलिंग करण्याचे काम सुरु झाले आहे. कोकणातील सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनदेखी शिंदे यांनी केले. (प्रतिनिधी)