कणकवलीत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:14 AM2018-10-22T05:14:20+5:302018-10-22T05:14:31+5:30

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कणकवली शहरात मात्र प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे गेले काही महिने काम थांबविण्यात आले होते.

Starting the work of four-laning of Mumbai-Goa highway in Kankavli | कणकवलीत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ

कणकवलीत मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास प्रारंभ

Next

कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कणकवली शहरात मात्र प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे गेले काही महिने काम थांबविण्यात आले होते. अखेर २० आॅक्टोबरपासून कणकवली शासकीय विश्रामगृह येथून महामार्ग रुंदीकरणाचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. तर शहरातील अनेक प्रकल्पग्रस्तांनी स्वत:हून महामार्ग सीमांकन क्षेत्रातील अतिक्रमण किंवा आपली दुकाने, घरे रिकामी केली. रविवारी जानवली नदीपासून विविध दुकानांचे फलक संबंधित ठेकेदाराने यंत्राच्या साहाय्याने हटविले.
सिंधुदुर्गातील संवेदनशील शहर म्हणून कणकवलीची ओळख आहे. या शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न महामार्गाचे काम करत असताना निर्माण होण्याची शक्यता आहे. काम गतीने करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी विरोध झाला तरी वेळप्रसंगी पोलिसी बळाचा वापर करू, असा इशारा दिला आहे. कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम ४५ मीटरनुसार होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची यापूर्वीच भूसंपादन असलेली जागा ३० मीटर आहे. या ३० मीटरमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे, घरे, स्टॉल बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी आम्ही काम सुरू केलेले आहे. महामार्ग रुंदीकरण करण्याची पहिली प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर फ्लायओव्हरचे काम हाती घेण्यात येईल. फ्लाय ओव्हरचे पीलर उभे करण्यापूर्वी वाहतुकीसाठी सर्व्हिस रोड बांधण्यात येणार असल्याचे शेडेकर यांनी सांगितले .
मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ चे चौपदरीकरण करत असताना कणकवली शहराचा विकास होण्याच्या दृष्टीने आमचे सर्वतोपरी प्रयत्न असणार आहेत. कणकवलीत बॉक्ससेल ब्रिज मंजूर असताना तो रद्द करून शासनाने आता वाय आकाराच्या ब्रिजची मंजुरी दिली आहे. त्यामुळे कणकवली शहराला साजेसा हा रस्ता होणार आहे. ४५ पीलर या ब्रिजसाठी लागणार आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम करत असताना प्रकल्पग्रस्त आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शेडेकर यांनी केले आहे.
>कणकवली शहरातील ४५ मीटरची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. वीजवाहिन्या, दूरध्वनी सेवेच्या वायर व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या ४५ मीटरमध्ये गटार व पदपथाबरोबरच सर्व्हिस रोड असणार आहेत. वीजवाहिन्या अंडर ग्राउंड टाकण्यात येणार आहेत. दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी खुले असणार आहेत. त्यानंतर ४५ पीलरचा सहा पदरी फ्लायओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहे.
- प्रकाश शेडेकर, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

Web Title: Starting the work of four-laning of Mumbai-Goa highway in Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.