कोकणवासीयांसाठी आशादायी ठरलेला राज्याचा अर्थसंकल्प

By Admin | Published: March 18, 2017 10:34 PM2017-03-18T22:34:25+5:302017-03-18T22:34:25+5:30

रत्नागिरीकरांच्या प्रतिक्रिया : काजूसाठी तरतूद, जलयुक्त शिवारला निधी, शामराव पेजे महामंडळासाठी तरतूद...

State budget optimized for Konkan residents | कोकणवासीयांसाठी आशादायी ठरलेला राज्याचा अर्थसंकल्प

कोकणवासीयांसाठी आशादायी ठरलेला राज्याचा अर्थसंकल्प

googlenewsNext

रत्नागिरी : काजूसाठी तरतूद, जलयुक्त शिवारला निधी, शामराव पेजे महामंडळासाठी तरतूद, काजू, नारळावरील कर कमी अशा विविध तरतुदींचा कोकणला फायदा होईल. त्यामुळे शनिवारी मांडलेला राज्य अर्थसंकल्प कोकणसाठी फायदेशीर असल्याचा सूर रत्नागिरीकरांनी प्रतिक्रियेद्वारे व्यक्त केला.
सध्या राज्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच विभागांना न्याय देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाने केल्याचे अनेक रत्नागिरीकरांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. विमानतळ, जलवाहतुकीसाठी केलेली तरतूद नक्कीच उत्कृष्ट आहे. त्यामुळे महामार्गावरील गर्दी विभागली जाईल, असे मतही अनेकांनी व्यक्त केले. या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)

जनतेच्या आशा पल्लवित करणारा अर्थसंकल्प
शासनाच्या ध्येयधोरणाशी एकरूप होऊन अर्थसंकल्प मांडण्यात आला. कोकण विकास महामंडळ निर्मिती नक्कीच स्वागतार्ह आहे. काजूसाठीची तरतूद कोकणचे अर्थकारण गतीमान करण्यास मदत होईल. जलयुक्त शिवारसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वांनाच दिलासा देणारा आहे. आव्हानात्मक परिस्थितीत मांडलेला अर्थसंकल्प कोकणाला न्याय देणारा असल्यामुळे जनता नक्कीच त्याचे स्वागत करेल. शामराव पेजे महामंडळाला केलेली तरतूद न्याय्य आहे.
- अ‍ॅड. दीपक पटवर्धन,
अध्यक्ष, स्वामी स्वरुपानंद पतसंस्था, रत्नागिरी.



कोकण विकास महामंडळाची आवश्यकता
आतापर्यंत कोकण विकास महामंडळाची घोषणा वारंवार झाली. परंतु, निधी अभावी महामंडळाची घोषणा हवेत विरली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महामंडळ नक्कीच फायदेशीर ठरेल. महामंडळाची घोषणा करून निधीची तरतूद करण्यात येणार असल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागतील.
- एम. ए. काजी, शेतकरी.
ग्रेडिंगचा पर्याय
कोकणासाठी अर्थसंकल्पातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. आंबा उत्पादन खर्चिक असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. काजूसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. कोकणाला अर्थाजन मिळवून देणाऱ्या आंब्याचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे. यावर अर्थसंकल्पात तरतूद होणे महत्त्वाचे होते.
- अविनाश प्रभूमहाजन, शेतकरी


शेतकऱ्यांना फायदेशीर अर्थसंकल्प
अर्थसंकल्प निश्चित उत्तम असून, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. काजू, नारळावरील कर कमी केल्यामुळे दरदेखील खाली येतील. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. विमानतळ, जलवाहतुकीसाठी केलेली तरतूद नक्कीच उत्कृष्ट आहे. त्यामुळे महामार्गावरील गर्दी विभागली जाईल. विमानसेवा महत्त्वाच्या प्रत्येक शहरासाठी आहे. जलवाहतुकीमध्ये कार्गोसेवा सुरू केली तर आंबा पाठविण्यासाठी त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.
- आनंद देसाई,
उद्योजक, पावस

शेतकरी, सामान्यांचा विचार केलेला अर्थसंकल्प
कोकणातील अतिशय महत्त्वाचे पीक असलेल्या कोकम (आमसुले) आणि नारळ यांना पूर्णपणे करसवलत देण्यात आली आहे. त्यामुळे या पिकांचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर भविष्यात यावरील उद्योग वाढीस लागतील. बऱ्याच बाबतीत करमाफी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच विविध जीवनोपयोगी वस्तूंवरील करमाफीमुळे नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे. एकंदरीत, या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सामान्य नागरिकांचा विचार केला आहे, असे म्हणायला हरकत नसावी.
- अ‍ॅड.कल्पलता भिडे
बंदरे, मत्स्योत्पादनासाठी विशेष घोषणा नाही...
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी तरतूद केली आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन विकास वाढणार आहे. तसेच महाराष्ट्रातील रेल्वे मार्गासाठी दीडशे कोटींची तरतूद केली आहे.यात कोकणसाठी किती, ते कळायला हवे. मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागासाठी २५ कोटींची तरतूद केली आहे. त्यात मुंबई उपकेंद्राला काही भाग मिळाल्यास कोकणला त्याचा फायदा होईल. मात्र, शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ज्या योजना आहेत, त्या दिसताना चांगल्या दिसत असल्या तरी त्याच्या शेतमालाच्या दृष्टीने मूळ उपाययोजनांसाठी आवश्यक तरतूद दिसत नाही. कोकणातील बंदरे तसेच मत्स्योत्पादनासाठी मात्र विशेष अशी कोणतीही घोषणा दिसत नाही.
- प्रा. उदय बोडस

Web Title: State budget optimized for Konkan residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.