‘संशयाचा कल्लोळ’ वठला--राज्य नाट्य स्पर्धा
By admin | Published: February 2, 2015 10:41 PM2015-02-02T22:41:40+5:302015-02-02T23:47:06+5:30
उत्तम सादरीकरण : नेपथ्य, प्रकाशयोजनेत थोडं कमी
महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘सं. संशयकल्लोळ’ हे सादर झालेले १४वे नाटक. हे नाटक संगीत विद्यालय, रत्नागिरी संस्थेने सादर केले.नाटकाचे वैशिष्ट्य असे की, या नाटकातील प्रमुख भूमिका वयाने ज्येष्ठ असलेल्या मंडळींनी रंगविल्या. नाटकाची सुरुवात ‘सौख्य सुधा वितरो’ या नांदीने झाली.पडदा उघडताच आकर्षक नेपथ्याने लक्ष वेधून घेतले. या नाटकात पद्मनाभ जोशी (अश्विनशेठ) यांनी जुन्या शैलीतील तडफदार गायकीने नाट्यपदे रंगविली. खड्या आवाजातील पदांनी नाट्यगृह दणाणत होते. रसिकांनीही त्यांच्या पदांना चांगली दाद दिली. मयुरी जोशी (कृतिका) यांनी संशयी कृ तिका चांगली रंगविली. चालणे, बोलणे, वेशभूषा याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याचे जाणवले.दीपेश काळे (भादव्या) यांनी आपली भूमिका रंगवण्याचा प्रयत्न कौतुकास्पद होता. ग्रामीण बोलीभाषेतील संवाद म्हणताना मेहनत घेतल्याचे जाणवले. गौरी दातार (रेवती) यांचा आपली भूमिका निभावण्याचा प्रयत्न चांगला होता. त्यांनी ‘साम्य तीळही नच’, ‘धनाढ्य आपण मान्य कुळीचे’, ‘संशय का मनी आला’, ‘भोळी खुळी’, ‘मजवरी तयांचे प्रेम खरे’ ही पदे गायली. काही गीतांमध्ये लय कमी येत होती.
रमेश पटवर्धन (फाल्गुनराव) हे वयोवृद्ध कलाकार होते. पण त्यांचे पाठांतर, रंगमंचावरील चापल्य तरुणांनाही लाजवणारे होते.
शंकर वरक (वैशाख), देवेंद्र धामणस्कर (नोकर), उज्ज्वला धामणस्कर (रोहिणी), वृंदा सावंत (मघा), स्वाती शेंबेकर (स्वाती), प्रियांका लोध (अनुराधा), मयुरेश जोशी (साधू) यांनी आपल्या भूमिका पेलल्या. मात्र, काही कलाकारांचे शब्द अडखळले.
या नाटकाला संगीत मार्गदर्शन व आॅर्गनसाथ विजय रानडे यांनी दिली. तसेच निखील रानडे यांनी तबला साथ केली. रानडे द्वयीनी परस्पर समन्वयाने नाटकाला उत्तम संगीतसाथ केली.प्रवेश बदलताना नेपथ्य व प्रकाशयोजना यामध्ये घोळ होत होता. तरीही ज्येष्ठ कलाकारांचा या वयातही नाटक बसविण्याचा व ते तडीस नेण्याचा प्रयत्न कौतुकास्पद होता. या नाटकाचे कथानक म्हणून तसबिरीच्या घोटाळ्यावरुन निर्माण झालेला संशयाचा कल्लोळ.ज्येष्ठ कलाकारांचा नाटक सादरीकरणाचा प्रयत्न डोळस होता. त्यामुळे संशयकल्लोळाने रसिकांना हास्याची पर्वणी लाभली. एकंदर संशय कल्लोळ ठिक झालं इतकंच म्हणाव लागेल.
संध्या सुर्वे