‘पर्सनेट’विरोधात ठिय्या आंदोलन
By admin | Published: December 15, 2015 09:48 PM2015-12-15T21:48:00+5:302015-12-15T23:36:44+5:30
कारवाईची मागणी : शिवसेना आमदार आक्रमक
मालवण : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात शिवसेना आमदार पर्ससीननेट मासेमारीविरोधात आक्रमक झाले. ‘पर्ससीननेट हटवा, पारंपरिक मच्छिमार जगवा’ ‘पर्ससीन नेट हटवा, सागरी पर्यावरण वाचवा’ अशा घोषणा देत शिवसेना आमदारांनी नागपूर अधिवेशन सभागृह पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. सरकार पर्ससीननेट मासेमारीसंदर्भात ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेच्या कोकणातील आमदारांनी घेतला. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत कर्नाटक, गोवा, गुजरात आणि केरळ राज्यातील पर्ससीन नेट ट्रॉलर्स आणि हायस्पीड ट्रॉलर्स घुसून मत्स्यधनाची लयलूट करीत आहे. त्यामुळे स्थानिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच राज्यातील अधिकृत आणि अनधिकृत पर्ससीन नेट नौका पारंपरिक मच्छिमारांच्या हद्दीत येऊन अगदी किनाऱ्यालगत मासेमारी करीत असल्याने पारंपरिक मच्छिमारांचा संघर्ष तीव्र बनला आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली आमदार राजन साळवी, प्रताप सरनाईक, प्रकाश आबीटकर, तृप्ती सावंत, मनोहर भोईर, मंदाताई म्हात्रे, संजय कदम आदींनी अधिवेशन सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. (प्रतिनिधी)
सागरी अधिनियम अंमलबजावणीसाठी अडीच कोटी---दरम्यान, सोमवारी आमदार वैभव नाईक यांनी सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला असता महाराष्ट्र राज्य सागरी अधिनियम १९८१च्या अंमलबजावणीसाठी सुमारे अडीच कोटी रुपये मंजूर करण्यात येणार असल्याचे उत्तर देण्यात आले. पर्ससीन नेटसंदर्भात पुन्हा सभागृहात चर्चा केली जाणार असल्याचे आमदार वैभव नाईक म्हणाले.