सांस्कृतिक केंद्रासाठी अजूनही प्रयत्न सुरुच
By admin | Published: February 18, 2015 10:28 PM2015-02-18T22:28:30+5:302015-02-18T23:50:52+5:30
आठ दिवसात निविदा : २ कोटी ७० लाखांचे अंदाजपत्रक तयार
चिपळूण : शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा पडदा आता लवकरच उघडणार असून, या केंद्राच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ७० लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. येत्या ८ दिवसात निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.सन २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीला धोका निर्माण झाल्याने हे केंद्र बंद आहे. नगराध्यक्षा सावित्री होमकळस, उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांच्या प्रयत्नाने केंद्राच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, लवकरात लवकर हे केंद्र सुरु व्हावे, यासाठी आम्ही चिपळूणकर व नाट्यप्रेमी संघटना यांच्यातर्फे नगर परिषद प्रशासनाकडे पत्रव्यवहारही करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी पारावरचा लोकोत्सव हा कार्यक्रमही सादर करण्यात आला.इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र दुरुस्तीची फाईल अन्य फाईलींमध्ये दडपून ठेवण्यात आली होती. उपनगराध्यक्ष शाह यांनी मंत्रालय स्तरावर त्याचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. यापूर्वीच्या राज्य शासनाकडून या केंद्राच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर झाला आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे काम होण्यास विलंब झाला. २ कोटी ७० लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभााकडे ३ लाख ३४ हजारांचा धनादेशही पाठवण्यात आला आहे. येत्या ८ दिवसात निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्षात केंद्राच्या दुरुस्ती कामाला प्रारंभ होणार आहे. (वार्ताहर)