चोरीछुपे पुतळा दहन म्हणजे काँगे्रसचा भ्याडपणा
By admin | Published: July 22, 2016 11:07 PM2016-07-22T23:07:43+5:302016-07-23T00:17:47+5:30
यशवंत आठलेकर : ‘त्यांना’ अटक न केल्यास आंदोलन
दोडामार्ग : चोरीछुपे मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे हे कृत्य म्हणजे भ्याडपणाचे लक्षण आहे. त्यांच्यात जर हिंमत होती, तर त्यांनी खुलेआम छातीठोकपणे हे कृत्य केले असते. त्यांच्या भ्याड कृत्याचा आम्ही निषेध करतो. तसेच पोलिसांनी हे दुष्कृत्य करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली नाही, तर आज, शनिवारपासून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजपचे जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर यांनी दिला.
काँगे्रसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याची घटना कोनाळ येथे घडल्यानंतर त्याच्या संतप्त प्रतिक्रिया दोडामार्ग तालुक्यात उमटल्या. भाजपचे जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाणे व तहसील कार्यालयात धडक देत असे कृत्य करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अटक न झाल्यास आजपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. याबाबतची तक्रारही देण्यात आली. त्यानंतर येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निषेध करण्यात आला.
यावेळी आठलेकर म्हणाले, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भ्याड वृत्ती आहे. चोरीछुपे मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळणे म्हणजे त्यांच्यातील भ्याडपणाचे लक्षण आहे. त्यांच्यात जर हिंमत असती, तर त्यांनी खुलेआमपणे हे कृत्य केले असते व फोटोसह वृत्तपत्रात बातम्या छापून आणल्या असत्या. मात्र तसे काही केले नाही. यावरून त्यांच्यात धमक नसल्याचे दिसून येते. जर या संबंधित काँगे्रस कार्यकर्त्यांना अटक झाली नाही, तर भाजपमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शिवाय त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष संदीप नाईक, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष स्मिता आठलेकर, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, नगरसेवक चेतन चव्हाण, सुधीर पनवेलकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)