चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत : दीक्षित गेडाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 05:17 PM2019-07-25T17:17:34+5:302019-07-25T17:21:28+5:30
वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याखाली सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाला बालकल्याण समिती, उमरखडी डोंगरी-मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेला ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच वेंगुर्ले वेतोबा मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ले पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याखाली सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाला बालकल्याण समिती, उमरखडी डोंगरी-मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेला ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच वेंगुर्ले वेतोबा मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी त्याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.
वेंगुर्ले येथे मोबाईल शॉपीमध्ये चोरी झाली होती. यात मोबाईल, चार्जर, पॉवर बँक, रोख रक्कम आदींवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आपली तपासाच्या दिशेने कार्यवाही सुरू केली होती.
दरम्यान या चोरी प्रकरणी एलसीबीच्या पथकाने उत्तरप्रदेश येथील १६ वर्षीय विधीसंघर्ष बालकाला बालकल्याण समिती उमरखडी डोंगरी-मुंबई येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेले ६ मोबाईल, ४ मोबाईल चार्जर, ५ चार्जर कार्ड, ३ पॉवर बँक, १ हेडफोन, १ ब्ल्यूटुथ हेडफोन, १ ब्ल्यूटुथ स्पीकर, ३ जुनी मनगटी घड्याळे, ७ पॉवर बँक कनेक्टर आणि १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच ६ जुलै रोजी वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्री वेतोबा मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांनी डल्ला मारत ४० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यात चोरी प्रकरणात विधीसंघर्ष बालक सीसीटीव्हीमध्ये दिसत असल्याने संबंधित बालकाची दानपेटी चोरीप्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती दीक्षित गेडाम यांनी दिली.