अंगावर दगड कोसळून कामगाराचा जागीच मृत्यू, भरावाची माती बाजूला करताना झाला दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 08:11 PM2017-12-11T20:11:07+5:302017-12-11T20:11:23+5:30
मालवण : तालुक्यातील हेदूळ येथील डोंगराळ भागात काळ्या दगडाच्या खाणीत काम करीत असताना मातीचा काही भाग कोसळून एका परप्रांतीय खाण कामगाराचा जागीच मृत्यू झाला.
मालवण : तालुक्यातील हेदूळ येथील डोंगराळ भागात काळ्या दगडाच्या खाणीत काम करीत असताना मातीचा काही भाग कोसळून एका परप्रांतीय खाण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. डोंगरावरील मातीसहीत एक मोठा दगड अंगावर कोसळल्याने हा अपघात घडला. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. इराण्णा अमरप्पा चव्हाण (५०, रा. मूळ कर्नाटक) असे या कामगाराचे नाव आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी घडली.
हेदूळ येथील दगडाच्या खाणीमध्ये सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास इराण्णा चव्हाण हा अन्य दोन कामगारांसह भरावाची माती बाजूला करत होता. यावेळी डंपर चालक नामदेव परब हे देखील उपस्थित होते. माती भरण्याचे काम सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात अचानक उंच डोंगरावरील एक भलामोठा दगड घरंगळत खाली येत काही क्षणात इराण्णा चव्हाण याच्या अंगावर कोसळला. यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या इराण्णा याला इतर कामगारांनी तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ केली. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेबाबत डंपर चालक नामदेव परब याने कट्टा पोलीस दूरक्षेत्राला तसेच खाण चालक अमरसेन सावंत यांना मोबाईलवरून संपर्क साधून घटनेची माहिती दिली. कट्टा पोलीस दूरक्षेत्राचे उत्तम आंबेरकर, स्वप्नील तांबे, योगेश सराफदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत दशरथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मृत इराण्णा चव्हाण हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी कर्नाटकहून इराण्णा याचे नातेवाईक आल्यानंतर त्याचा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. तर इराण्णा याच्या कुटुंबीयांना विमा रक्कम त्याचबरोबर रोख स्वरूपात मदत केली जाणार असल्याचे खाण चालक सावंत यांनी सांगितले.