सिंधुदुर्गात एसटी संपाला 'गालबोट', मालवणमध्ये बसवर 'दगडफेक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 01:04 PM2021-12-14T13:04:27+5:302021-12-14T13:06:57+5:30

सिंधुदुर्गातही गेल्या ३५ दिवस एसटी संपामुळे लालपरी थांबली होती. यात सोमवारी येथील आगारातील तीन कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतल्याने मालवण ओरोस मार्गावर पहिली एसटी बसफेरी सोडण्यात आली.

Stone pelted by unknown persons on Malvan Katta Sindhudurg ST bus | सिंधुदुर्गात एसटी संपाला 'गालबोट', मालवणमध्ये बसवर 'दगडफेक'

सिंधुदुर्गात एसटी संपाला 'गालबोट', मालवणमध्ये बसवर 'दगडफेक'

googlenewsNext

मालवण : येथील एसटी आगारातून सुटलेल्या मालवण कट्टा सिंधुदुर्गनगरी या बसफेरीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास आनंदव्हाळ येथील मुख्य रस्त्यावर घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच एसटीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली. या घटनेमुळे एसटी संपाला गालबोट लागले.

महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सिंधुदुर्गातही गेल्या ३५ दिवस एसटी संपामुळे लालपरी थांबली होती. यात सोमवारी येथील आगारातील तीन कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतल्याने मालवण ओरोस मार्गावर पहिली एसटी बसफेरी सोडण्यात आली.

आज सकाळी ९.०५ वाजता येथील आगारातून चालक अजित भोगवेकर व वाहक आंबोजकर हे मालवण कट्टा सिंधुदुर्गनगरी ही एसटी बसफेरी घेऊन निघाले. बसमध्ये ओरोस येथे शासकीय कार्यालयातील तेरा कर्मचारी होते. बसफेरी आनंदव्हाळ येथे आली असता अज्ञातांनी बसवर दगडफेक केली. त्यानंतर ते अज्ञात तेथून पळून गेले. या घटनेची माहिती एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आगारात कळविली असता आगारप्रमुख सचेतन बोवलेकर, अमोल कामते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करत माहिती घेतली. या घटनेमुळे प्रवाशांचे हाल झाले. सर्व प्रवाशांनी अन्य पर्यायी वाहनांनी आपली कार्यालये गाठली.

एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे जिल्ह्यात एसटीची वाहतूक ठप्प आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना हा संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनानुसार येथील आगारात वाहक, चालक व मॅकेनिक असे तीन कर्मचारी कामावर रुजू झाले. त्यामुळे तब्बल ३४ दिवसानंतर मालवण आगारातून सोमवारी पहिली बसफेरी सुरू करण्यात आली. यात आजच्या दुसऱ्या दिवशी या बसफेरीवर दगडफेकीची घटना घडल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या घटनेची गंभीर दखल एसटी प्रशासनाने घेतली आहे.

Web Title: Stone pelted by unknown persons on Malvan Katta Sindhudurg ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.