कणकवली-कळसुली एसटीवर दगडफेक, आठवड्यातील दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 11:49 AM2022-01-12T11:49:42+5:302022-01-12T11:56:43+5:30
याच मार्गावर आठवड्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
कणकवली : कणकवली-कळसुली या एसटीवर आज (बुधवारी) सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञाताकडून दगडफेक केल्याची घटना घडली आहे. कणकवली आगारातून सकाळी ७.३० वाजता (क्रमांक एमएच २० बीएल ४०८२) ही एसटी बस कळसुलीच्या दिशेने जात असताना हळवल इथे या एसटीवर अज्ञाताने समोरील काचेवर दगडफेक केली. तसेच तो तेथून पसार झाला.
यावेळी बस मधून तीन प्रवासी प्रवास करत होते. मात्र, यात कुठल्याही प्रवासी किंवा चालक-वाहकास दुखापत झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या एसटीमध्ये चालक म्हणून एस. ए. चव्हाण आणि वाहक म्हणून आर. पी. लोकरे हे कार्यरत होते. घटनेनंतर यासंदर्भात कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली.
याच मार्गावर आठवड्यात दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. हा प्रकार नक्की अज्ञाताकडून होत आहे की संपाच्या पार्श्वभूमीवर जाणीवपुर्वक केला जात आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे.