चुकीच्या साकवांची कामे थांबवा
By admin | Published: February 11, 2015 09:51 PM2015-02-11T21:51:31+5:302015-02-12T00:36:02+5:30
उपोषणाचा इशारा : सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना शिवसेनेने जाब विचारला
कणकवली : तालुक्यात विशेष घटक योजनेंतर्गत दलितवस्तीमध्ये साकवाची कामे मंजूर झाली आहेत, परंतु आवश्यक असलेल्या ठिकाणी साकवाचे बांधकाम न होता अन्य ठिकाणी हे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या साकवाचा फायदा दलितवस्तीतील नागरिकांना होणार नाही. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी सुरू असलेली साकवाची बांधकामे तत्काळ थांबविण्यात यावी, अन्यथा दलितवस्तीतील लोकांना एकत्र करून आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता छाया नाईक यांना दिला.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता छाया नाईक यांना तालुक्यातील विविध कामांबद्दल जाब विचारला. उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, नगरसेवक सुशांत नाईक, रिमेश चव्हाण, अजित काणेकर, बाळा येळूरकर आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विशेष घटक योजनेंतर्गत तालुक्यातील दलितवस्तीमध्ये साकव बांधण्याचे १७ कामे मंजूर झाली आहेत. ही कामे एकाच ठेकेदाराला देण्यात आली. हा ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करत असून दलित वस्तीमधील लोकांना कोणताही फायदा होणार नाही, असे दिसून येत आहे.
जानवली-बौद्धवाडी येथील साकव बौद्धवाडीला जोडला जातो का याची खात्री करा. संबंधित वाडीमध्ये साकवाची आवश्यकता आहे का याचा खुलासा करण्यात यावा. ही कामे तत्काळ थांबवण्यात यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ठेकेदारास सदर कामाचे देयक देण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यात आली.
आचरा बायपास मार्गाचे काम झालेले नसताना ४० लाख रूपये ठेकेदाराला कसे काय अदा करण्यात आले? असा प्रश्न राजू राठोड यांनी केला. नेमकी वस्तुस्थिती माहिती करून घेऊ, असे छाया नाईक यांनी सांगितले. महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे. रस्त्यालगत आता सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही काम मंजूर करू नये, अशी विनंती सचिन सावंत यांनी केली. (प्रतिनिधी)
कामाची पाहणी करावी
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या कामाचे रजिस्टर व बिल बुकाच्या यादीची प्रत आम्हाला द्यावी, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली. त्यानुसार छाया नाईक यांनी यादी देण्याचे मान्य केले. फोंडाघाट येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.