पंचायत समिती इमारतीचे बांधकाम थांबवा

By admin | Published: July 15, 2016 11:09 PM2016-07-15T23:09:20+5:302016-07-15T23:55:52+5:30

रवींद्र चव्हाण : निकृष्ट दर्जा ; चौकशी करुन अहवाल पाठविण्याचे दिले आदेश

Stop the construction of the panchayat committee building | पंचायत समिती इमारतीचे बांधकाम थांबवा

पंचायत समिती इमारतीचे बांधकाम थांबवा

Next

वैभववाडी: पंचायत समिती इमारतीच्या सुरु असलेले निकृष्ट बांधकाम तातडीने थांबवा, आणि झालेल्या कामाची चौकशी करुन ताबडतोब अहवाल द्या. जोपर्यंत अहवाल देत नाही तोपर्यंत काम पुन्हा सुरु करु नये, असे आदेश बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गटविकास अधिका-यांना दिले. तसेच निकृष्ट बांधकामाबाबत ठेकेदार व जिल्हा परिषद बांधकामचे शाखा अभियंता पद्माकर चांडके यांना मंत्री चव्हाण यांनी धारेवर धरुन जाब विचारला.
तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी २ कोटी ५४ लाखांच्या पंचायत समिती इमारतीचे काम निकृष्ट दजार्चे होत असून इमारतीचा स्लॅब धो धो पाऊस सुरु असताना घातला गेल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री चव्हाण यांनी ताबडतोब इमारतीच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी इमारतीच्या कामाची दशा पाहून मंत्री चव्हाण संतापले. त्यांनी ठेकेदार आणि जिल्हा परिषद बांधकामचे शाखा अभियंता चांडके यांना बोलावून घेऊन धारेवर धरले.
इमारतीचा स्लॅब कधी घातला? त्यादिवशी पाऊस किती झाला? अशी विचारणा मंत्री चव्हाण यांनी केली. तालुक्यात १५५ मिलिमीटर पावसाची त्यादिवशी नोंद झालेली असताना ठेकेदार आणि शाखा अभियंत्या यांनी 'पाऊस कमी होता. अशी सारवासारव केली. परंतु आदल्या दिवशी सव्वादोनशे मिलिमीटर पाऊस झालेला होता. तरीही
दुसऱ्या दिवशी स्लॅब का घातला? असे विचारले तेव्हा ठेकेदाराने आधीच स्टील बांधून तयारी केली होती, असे उत्तर शाखा अभियंता चांडके यांनी दिले. त्यामुळे मंत्री चव्हाण, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली यांनी चांडके व ठेकेदाराला फैलावर घेतले.
कामाला विलंब का झाला? शासन करोडो रुपये खर्च करते त्याची अशाच पध्दतीने वाट लावणार आहात काय? अशा शब्दात कानउघाडणी करुन पंचायत समितीच्या इमारतीचे काम तत्काळ थांबविण्याचे आदेश राज्यमंत्री चव्हाण यांनी दिले. तसेच झालेल्या कामांची पूर्ण चौकशी करून ताबडतोब अहवाल देण्याचे आदेश सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांना देत जोवर अहवाल मिळत नाही तोवर पुन्हा इमारतीचे काम सुरु करु नये, असे सांगितले. यावेळी सभापती शुभांगी पवार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, कणकवलीचे रवींद्र शेटये, सज्जन रावराणे आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

नोकरी धंद्यासाठी होणारे स्थलांतर थांबणार
जिल्ह्यात नोकरी व रोजगाराच्या संधी निर्माण होऊ न शकल्यामुळे येथील तरुणांचे मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरु आहे. त्यामुळे बंदर विकास आणि माहिती प्रसारण खात्याच्या माध्यमातून कोकणातील बंदरांचा विकास करताना रोजगार निर्मिती करुन कोकणातील स्थलांतर थांबविण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामांचा पाठपुरावा राजन तेली, प्रमोद जठार यांच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे ती सर्व कामे तडीस नेण्यासाठी मंत्रीपदाची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करेन, अशी ग्वाही चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरोग्याच्या प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठक
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व अन्य संवगार्तील रिक्त पदांबाबत पत्रकारांनी विचारले असता, ग्रामीण भागात काम शासकीय करण्याची डॉक्टरांची मानसिकता नाही. त्याचा फटका शासकीय आरोग्य यंत्रणेला बसत आहे. परंतु, वैद्यकीय धोरणात काही सुधारणा करता येतील का याबाबत शासनस्तरावर विचार केला जाईल. त्याचबरोबर सिंधुदुगार्तील आरोग्याच्या प्रश्नांबाबत अधिवेशन काळात आपल्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Stop the construction of the panchayat committee building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.