अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला
By admin | Published: May 12, 2017 11:08 PM2017-05-12T23:08:43+5:302017-05-12T23:08:43+5:30
अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला
रत्नागिरी : गरिबीमुळे १७ वर्षीय मुलीचे लग्न करण्याचा राजापूर तालुक्यातील एका कुटुंबाचा प्रयत्न शुक्रवारी रत्नागिरीतील चाईल्ड लाईन संस्थेच्या जागरूक पदाधिकाऱ्यांनी रोखला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सहकार्याने १६ मे रोजी होणारा हा विवाह थांबविण्यात आला असून, मुला-मुलीच्या नातेवाइकांना समज देण्यात आली आहे.
चाईल्ड लाईनच्या रत्नागिरी जिल्हा कार्यालयात एक निनावी फोन आला. राजापूर तालुक्यातील एका गावात मे महिन्यात अल्पवयीन मुलीचे लग्न होणार असल्याची माहिती दिली. चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींनी मुंबईतील प्रमुखांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बालकल्याण समितीलाही याची माहिती देण्यात आली. आवश्यक ते पुरावे गोळा करण्यात आले. मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच लग्नाची पत्रिका मिळवून संबंधित नावाची खात्री केली गेली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व बालकल्याण समितीला पत्र पाठवून मार्गदर्शन घेण्यात आले.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार राजापूर पोलीस ठाण्यातील निरीक्षक गावडे यांनी सोबत दिलेले कॉन्स्टेबल, महिला बालकल्याणचे पदाधिकारी व चाईल्ड लाईनचे प्रतिनिधी अशा सर्वांनी मुलीचे घर गाठले. घरात आई, आजोबा, मुलगी होती. वडील कामासाठी बाहेर गेले होते. सर्व लवाजमा घरी पोहोचल्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले.
बालविवाह, त्याचे दुष्परिणाम, त्याच्या कायदेशीर बाजू याबाबत सर्व माहिती त्या कुटुंबीयांना तसेच गावातील मंडळींना देण्यात आली. त्यानंतर सर्व कुटुंबीयांना राजापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे वराकडील सर्व मंडळींनाही बोलाविण्यात आले. मुलीची जन्मतारीख २९ फेब्रुवारी २००० असून, ती अवघी १७ वर्षे ४ महिने असल्याचे समजावून दिले. मुलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याची समज देऊन दोन्हीकडच्या नातेवाइकांचे लेखी जबाब घेण्यात आले. मुलगी १७ वर्षांची, तर मुलगा २३ वर्षे होता. दि. ४ मे रोजी साखरपुडाही झाला होता. केवळ मुलीच्या अल्पवयामुळे आता विवाह करता येणार नाही, असे सांगितल्यानंतर सर्व मंडळी तयार झाली व चाईल्ड लाईनच्या प्रयत्नांना यश आले.
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, राजापूरचे पोलीस निरीक्षक गावडे, लांजा महिला बालकल्याणचे संरक्षण अधिकारी, रत्नागिरी चाईल्ड लाईनचे संचालक नौमान नाईक, जिल्हा समन्वयक पी. एल. नंदीवाले, नितीश शेट्ये, आेंकार नागवेकर, तंजीन काजी, अभिषेक भुते यांनी हा बालविवाह रोखण्यासाठी पुढाकार घेतला.