वायरीत ग्रामस्थांचा रास्ता रोको
By admin | Published: January 2, 2017 11:06 PM2017-01-02T23:06:29+5:302017-01-02T23:06:29+5:30
मोहित झाड मारहाण प्रकरण : आचरेकरला जिल्ह्यातून हद्दपारची मागणी
मालवण : वायरी येथील मोहित मिलिंद झाड (वय १८) या महाविद्यालयीन युवकाला झालेल्या गंभीर मारहाणप्रकरणी सोमवारी दुसऱ्या दिवशीही वातावरण तंग होते. मोहित याच्यावर जीवघेणा हल्ला केलेल्या संशयित आरोपी सतीश आचरेकर याला अटक करून हद्दपार करा व आरोपीला पाठीशी घालणारे पोलिस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांना तत्काळ निलंबित करा, अशी संतप्त भूमिका वायरी ग्रामस्थांनी घेत देवबाग-मालवण रस्त्यावर रास्ता रोको केला.
दीड तास चाललेल्या या आंदोलनात ग्रामस्थांनी पोलिसांविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. त्यामुळे वायरी परिसरात दुसऱ्या दिवशीही तणावपूर्ण वातावरण होते.
दरम्यान, रास्ता रोको आंदोलनकर्त्यांची पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी घटनास्थळी भेट घेतली. यावेळी संतप्त नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आरोपीला अटक केली जाईल. तसेच वाघ यांची चौकशी करून कारवाईबाबत वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर दीड तासानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
मालवण बंदरजेटी येथे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘बदल्या’च्या प्रकारावरून झालेल्या भ्याड हल्ल्यात वायरीतील मोहित झाड याला गंभीर दुखापत झाली होती. जखमी मोहित याच्यावर गोवा येथे उपचार सुरू आहेत. याबाबत सतीश आचरेकर याने मारहाण केल्याप्रकरणी वायरी ग्रामस्थ आक्रमक बनले होते. आचरेकर याला हद्दपार करा, तसेच आरोपीला पाठीशी घातल्याने पोलिस अधिकारी वाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करा, या दोन मागण्यांसाठी वायरी ग्रामस्थांनी वायरी-भूतनाथ मंदिरात बैठक आयोजित केली होती.
पोलिस निरीक्षकांवर प्रश्नांचा भडिमार
बैठकीदरम्यान भूतनाथ मंदिर येथे आलेले पोलिस निरीक्षक अरविंद बोडके व सहायक पोलिस निरीक्षक विजय म्हसकर यांना ग्रामस्थांनी प्रश्न विचारत हैराण केले. ग्रामस्थांनी पोलिसांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत मारहाण प्रकरणातील आरोपी आचरेकर याच्याशी पोलिसांचे लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप केला. पोलिसांकडून आरोपीला अभय मिळाल्याने मारहाणीचा प्रकार घडला. त्यामुळे आरोपी व पोलिस अधिकारी यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी पोलिस निरीक्षक बोडके यांनी आरोपीला अटक करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. आरोपीला अटक करण्याची आपली जबाबदारी आहे, तर डॉ. वाघ यांच्याबाबतही चौकशी करून कारवाई अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाईल, असे सांगितले.
या बैठकीत सरपंच सुजाता मातोंडकर, शिवसेनेचे हरी खोबरेकर, काँग्रेसचे मंदार केणी, कमलाकर चव्हाण, संजय लुडबे, भगवान लुडबे, प्रसाद आडवनकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, अविनाश सामंत, लारा देसाई, महेश देसाई, संदेश चव्हाण, गौरव प्रभू, बबन चव्हाण, मंदार लुडबे, भालचंद्र केळुसकर, अन्वय प्रभू, प्रदीप मांजरेकर, बाबा मोरजकर, पोलिस पाटील पांडुरंग चव्हाण, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
देवबाग-मालवण मार्गावर दीड तास वाहने रोखली
आक्रमक बनलेल्या ग्रामस्थांनी मोहित झाड याच्या घरासमोरील देवबाग-मालवण मार्गावर तब्बल दीड तास रस्ता रोखून धरला. ट्रॅव्हल्सचालक राजेंद्र चव्हाण यांनी उपनिरीक्षक वाघ यांनी आदल्या दिवशी तक्रार घेतली असती तर सतीश याला पुन्हा मारहाण करण्याची हिंमत झाली नसती, असे सांगितले. दीड तास चाललेल्या या आंदोलनामुळे देवबाग व मालवणच्या दिशेने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात पर्यटक तसेच अपना बाजारासाठी गेलेल्या महिला व नागरिक, शालेय विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले. यावेळी रुग्ण घेऊन जाणाऱ्या एका रिक्षाला मार्ग करून देण्यात आला होता. अखेर पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी पोलिस उपनिरीक्षक डॉ. वाघ यांचा चौकशी अहवाल तत्काळ वरिष्ठांना पाठविण्यात येईल. तसेच मारहाण करणाऱ्या आचरेकर याला अटक करण्यासाठी पोलिस पथके तैनात केली असल्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.