सुरक्षेची हमी मिळेपर्यंत उत्पादन बंद
By admin | Published: December 7, 2015 11:34 PM2015-12-07T23:34:21+5:302015-12-08T00:33:34+5:30
सौरभ अरोरा : दीपक केमटेक्सप्रकरणी कामगारांचे भवितव्य अधांतरी
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीलगत आवाशी ग्रामपंचायत हद्दीतील दीपक केमटेक्स प्रा. लि. ही रंग उत्पादक कंपनी गेले दोन आठवडे बंद आहे. सोमवारी कंपनीचे मालक सौरभ अरोरा यांनी जोपर्यंत माझ्या कामगार व व्यवस्थापनाला सुरक्षेची हमी मिळत नाही, तोपर्यंत उत्पादन सुरु करणार नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मागील २० वर्षापासून लोटे औद्योगिक वसाहतीत मात्र आवाशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणारी दीपक केमटेक्स प्रा. लि. ही कंपनी रंग उत्पादनाचे काम करत आहे. एकूण चाळीस कामगार असणाऱ्या या कंपनीत दहा महिन्यांपूर्वी रुजू झालेले व्यवस्थापक जे. ए. महाडिक यांच्यामुळे कामगारांमध्ये भेदभाव निर्माण झाले आहेत.
नेमकी येथेच ठिणगी पडली आणि धीरेधीरे कामगारांमध्ये फूट निर्माण झाली. मागील आठ वर्षापासून येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यताप्राप्त युनियन कार्यरत आहे. या युनियनमधील सभासद असणाऱ्या तीन कामगारांना व्यवस्थापनाने तडकाफडकी कामावर येण्यास मज्जाव केला. याची दखल घेत मनसेच्यावतीने आलेले वैभव खेडेकर, राजेंद्र घाग, नाना चाळके व अन्य यांची व्यवस्थापक महाडिक यांच्याशी शाब्दीक बाचाबाची होऊन त्याचे पडसाद मारहाणीत उमटले. या घटनेच्या सहा दिवसानंतर महाडिक यांनी याबाबतची तक्रार लोटे पोलिसात दिली. मात्र, मारहाण झाली त्याचदिवशी रात्री महाडिक यांनी दहा हजार किलो माल रातोरात बाहेर काढून वीजपुरवठा बंद केला व ते उपचारासाठी निघून गेले. तेव्हापासून विविध चर्चांना पेव फुटले आहे. याबाबत कंपनी प्रशासनाचीही नेमकी भूमिका स्पष्ट होत नव्हती.
यावर तोडगा निघावा म्हणून याच पंचक्रोशीत असणारे सर्व कामगार आवाशी ग्रामपंचायतीकडे कैफीयत मांडण्यासाठी गेले. ग्रामपंचायतीने त्यांना धीर देत मालक व व्यवस्थापकांना बोलावून काहीतरी योग्य तोडगा काढू, असे आश्वासन दिले. मात्र, आजपर्यंत कंपनी पूर्ववत सुरु झालेली नाही.
या साऱ्या घडामोडींमध्ये कामगारांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. आता या सर्व प्रकरणाला जबाबदार कोण? याचे उत्तर शोधणे गरजेचे असून, असे प्रकार वारंवार घडल्यास आधीच मंदीच्या गर्तेत असणारी औद्योगिक वसाहत आणखीनच अडचणीत येणार असल्याचे उद्योजकांकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)
आता आम्ही मनसेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना खेड येथे भेटण्यासाठी चाललो आहोत. त्यांच्याकडून वा कुठल्याही राजकीय पक्षाकडून आम्हाला सुरक्षेची हमी मिळाल्याखेरीज मी उत्पादन सुरु करणार नाही. मी कंपनी बंद केलेली नसून केवळ उत्पादन बंद केले आहे. माझे कामगार आत्ताही कंपनीत कामावर आहेत. जे येत नाहीत तो त्यांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर आमची एमपीसीबीची कन्सेंट आॅक्टोबरमध्ये संपलेली असून, आम्ही लगेच त्यासाठी अर्ज केला आहे. त्याची रक्कमही भरणा केली आहे. लवकरच आम्हाला ते उपलब्ध होईल.
- सौरभ अरोरा, कंपनी मालक
कामगार कायद्यान्वये शंभरावरील असणाऱ्या कामगार संख्येच्या कंपनी व्यवस्थापनाला कंपनी बंद करताना आमच्यासह सर्वच विभागांना लेखी कळविणे बंधनकारक असते. मात्र, दीपक केमटेक्सचे वृत्त वर्तमानपत्रात वाचल्यानंतर मी, मालक व व्यवस्थापक यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून तुमची जी काही अडचण आहे ती आमच्या कार्यालयाला तत्काळ लेखी स्वरुपात द्या. मात्र, आजपर्यंत त्याला कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. येत्या दोन दिवसात मी स्वत: प्रत्यक्ष भेट देऊन समस्या जाणून घेणार आहे.
- अनिल दत्तात्रय गुरव,
सहाय्यक कामगार आयुक्त, रत्नागिरी
आता आम्ही मनसेच्या संबंधित पदाधिकाऱ्यांना खेड येथे भेटण्यासाठी चाललो आहोत. त्यांच्याकडून वा कुठल्याही राजकीय पक्षाकडून आम्हाला सुरक्षेची हमी मिळाल्याखेरीज मी उत्पादन सुरु करणार नाही. मी कंपनी बंद केलेली नसून केवळ उत्पादन बंद केले आहे. माझे कामगार आत्ताही कंपनीत कामावर आहेत. जे येत नाहीत तो त्यांचा प्रश्न आहे. त्याचबरोबर आमची एमपीसीबीची कन्सेंट आॅक्टोबरमध्ये संपलेली असून, आम्ही लगेच त्यासाठी अर्ज केला आहे. त्याची रक्कमही भरणा केली आहे. लवकरच आम्हाला ते उपलब्ध होईल.
- सौरभ अरोरा, कंपनी मालक
अशी प्रकरणेआमचे अखत्यारित येत नाहीत. परंतु, यातून काही अनर्थ घडू नये म्हणून त्यांनी आम्हाला कळविणे जरुरीचे आहे. त्याचबरोबर कंपनीचे सांडपाणी हे एमआयडीसीच्या पाईपलाईनद्वारे सीईटीपीला जाणे आवश्यक असून, खरेतर एमआयडीसीने त्याची दखल घ्यायला हवी. नाहीतर इतरही दीपक कंपनीसारखेच ईटीपीचे कनेक्शन बंद करुन टँकरने सीईटीपीत अथवा कुठेही घाण टाकतील. त्याचबरोबर त्यांच्या कन्सेंटचीही मुदत संपली असून, लवकरच कार्यवाही केली जाईल.
- डी. ए. मोरे,
प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी