दडपशाही थांबवा; अन्यथा आंदोलन

By admin | Published: January 10, 2016 12:09 AM2016-01-10T00:09:32+5:302016-01-10T00:09:32+5:30

नारायण राणे : युती सरकारमुळे कोकणाचा विकास ठप्प झाल्याचा आरोप

Stop repression; Otherwise the movement | दडपशाही थांबवा; अन्यथा आंदोलन

दडपशाही थांबवा; अन्यथा आंदोलन

Next

कणकवली : सध्याच्या शासनाने कोकण विशेषत: सिंधुदुर्गाबद्दल आकसाचे राजकारण करून विकास ठप्प केला आहे. सिंधुदुर्गातील मासेमारी, गौणखनिज, पर्यटन, आदी व्यवसायात सरकार विनाकारण हस्तक्षेप करीत असून, छळवणूक करीत आहे. ही दडपशाही थांबवावी, अन्यथा सरकारविरोधात आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा कॉँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिला. यावेळी आमदार नीतेश राणे, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते.
युती शासन रोजगार तर उपलब्ध करून देत नाही, तसेच असलेल्या रोजगारावर टाच आणत आहे. पर्यटनावर उदरनिर्वाह करीत असलेल्या देवबाग, तारकर्ली येथील व्यवसाय अनधिकृत ठरवून जोरदार कारवाई सुरू केली आहे. परराज्यांतील ट्रॉलर नियम धाब्यावर बसवत असल्याने स्थानिक मासळीपासून वंचित राहत आहेत. परप्रांतीयांविरोधात गस्तीनौकांचा वापर न करता स्थानिक मच्छिमारांवर प्रशासन दडपशाही करीत आहे. कोकणाला मिळणाऱ्या सवलती रोखण्यात येत आहेत. स्थानिक शिक्षक भरती होत नसून, अतिरिक्त ठरवून शिक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात येत आहे.
पाटबंधारे प्रकल्प, विमानतळ, सी-वर्ल्ड, दोडामार्ग एमआयडीसी, रेडी बंदर प्रकल्प बंद आहेत. पालकमंत्री, खासदार आणि सत्ताधारी आमदारांचे अधिकाऱ्यांसमोर काही चालत नाही. समस्यांची जाण नसल्याने नुसता पोरखेळ सुरू आहे. रिकाम्या डंपरवर एक लाखाचा दंड ठोठाविण्याचे प्रकार झाले. जास्तीत जास्त दंडाऐवजी किमान दंड आकारता येऊ शकतो. यामुळे येथील तरुणांचे व्यवसाय उद्ध्वस्त होत असून, प्रशासनाविरोधात जनतेचा एकदिवशी प्रक्षोभ होईल. जिल्ह्यातील उलाढाल ठप्प झाली असून, व्यापारी वर्ग त्रस्त आहे. जिल्हा अधोगतीकडे चालला आहे. सरकारने आकस सोडून बंद प्रकल्प सुरू करावेत, असे राणे म्हणाले. (प्रतिनिधी)
पारकर यांना कॉँग्रेसमध्ये नो इंट्री
संदेश पारकर यांनी पक्षाशी बेइमानी केली आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी त्यांची हकालपट्टी केली आहे. पारकर आणि कॉँग्रेसचा आता कोणताही संबंध नाही. जिल्ह्यात त्यांचे कोणतेही अस्तित्व राहणार नाही. कोणत्याही वरिष्ठ नेत्याला पारकर भेटत असले तरी माझ्या मनाविरुद्ध कॉँग्रेसमध्ये त्यांना कोणी घेणार नाही. पारकर यांचा वापर कसा केला? उलट त्यांना मी लाल दिवा दिला. त्यांच्या कारकिर्दीत कॉँग्रेसचे आमदार, खासदार पडले. त्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यास स्वस्थ बसणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
आरोग्यमंत्र्यांचे नाचता येईना अंगण वाकडे
सिंधुदुर्गात डॉक्टर येत नसल्याने विरोधक टीका करतात तर त्यांनी डॉक्टर टिकविण्याचा फॉर्म्युला द्यावा, असे सांगणाऱ्या आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी माझ्याकडे यावे, मी त्यांना फॉर्म्युला देतो. मंत्री असूनही डॉक्टर टिकविणे सावंत यांना समजत नाही. ‘नाचता येईना अंगण वाकडे’, अशी त्यांची स्थिती आहे, अशी टीका राणे यांनी केली.
मोबदल्याशिवाय काम होऊ देणार नाही
महामार्ग चौपदरीकरणासंदर्भात सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळी विधाने करण्यापेक्षा योग्य माहिती घेऊन बोलावे. रेडिरेकनरच्या चौपट मोबदला द्यावा लागणार असून, मोबदला मिळाल्याशिवाय कोणतेही काम होऊ देणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.
साहित्याला राजकारणाचा वास नको
साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीकांत सबनीस यांच्याबाबत सुरू असलेल्या वादाबाबत नारायण राणे म्हणाले की, साहित्य संमेलनाला राजकारणाचा वास लागू नये. सबनिसांनी पंतप्रधान मोदी असोत की अन्य कोणी, राजकारणाविषयी टिप्पणी करू नये, असे राणे म्हणाले.

Web Title: Stop repression; Otherwise the movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.